महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३१ जुलै ।। अकोल्यात मंगळवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या वाहनावर मनसे कार्यकर्त्यांनी हल्ला चढवला. या वेळी शासकीय विश्रामगृहाच्या आवारातील कुंडी उचलून मिटकरी यांच्या वाहनावर फेकणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे २९ वर्षीय कार्यकर्ते जय मालोकार यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने रुग्णालयात मृत्यू झाला.
अमोल मिटकरी यांच्या वाहनावर जय मालोकार यांनी कुंडी फेकली होती. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस व मनसे कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी झाली. या प्रकरणामुळे अस्वस्थ झालेले मालोकार यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथे त्यांचा मृत्यू झाला.
अतिदडपणामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. मनसेच्या इतर कार्यकर्त्यांसोबत जय मालोकार आंदोलनात सहभागी होते. मात्र, त्यांच्या निधनामुळे या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाल्याचे चित्र आहे.
मिटकरींची पहिली प्रतिक्रिया
मला अत्यंत वाईट वाटतंय, की २६ वर्षांचा एक तरुण… जो राडा झाला, त्यात कोणाच्या तरी चिथावणीनंतर.. तोही बिचारा तिथे पक्षाचं काम प्रामाणिकपणे करायला आला… पण एखादा अभ्यास करणारा तरुण हृदयविकाराच्या झटक्याने अशाप्रकारे जाणं.. समजा माझ्यावर हल्ला झाला असता, माझं काय झालं असतं, माझा परिवार उघड्यावर आला असता, यांना काय मिळतं? राजकारणाचा असा वापर चुकीचा आहे, राजकारणाचा स्तर इतका खाली जाता कामा नये, जो गेला त्याच्याबद्दल नितांत दुःख आहे, मी सुद्धा त्याच्या परिवाराची भेट घेईन, त्याने भावनेच्या भरात ते केलं असेल, तरी कष्टाळू मायबापाच्या घरातलं लेकरु गेलंय, माझी त्यांच्या पक्षप्रमुखांना (राज ठाकरे) विनंती आहे, त्यांनी मुंबई सोडून इथे (अकोल्यात) यावं, अशी प्रतिक्रिया अमोल मिटकरी यांनी दिली.
काय आहे प्रकरण?
राज ठाकरे यांच्याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने अकोल्यातील मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले. मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास आ. मिटकरी शासकीय विश्रामगृहावर आले असता मनसे कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीची तोडफोड केली. त्यांच्यावर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला.