महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३१ जुलै ।। पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी आषाढीनिमित्त एसटी महामंडळाच्या वतीने दरवर्षी विविध सवलतीतेत विशेष गाड्या सोडण्यात येतात. यंदा या विशेष सेवेतून एसटी महामंडळाने १ कोटी १५ लाखांची विक्रमी कमाई केली आहे. हे विक्रमी उत्पन्न मिळाल्याने पंढरपूरच्या विठुरायाने देखील लालपरीकडे पाहून बिग स्माईल दिली आहे. यामुळे अमरावती विभागीय महामंडळात उत्साह संचारल्याचे पाहायला मिळत आहे.
जिल्ह्यातून पंढरपूर यात्रा
महोत्सवाकरिता पंढरपूर, पुणे, आळंदी आदी ठिकाणी अतिरिक्त बसेस सोडण्यात आल्या होत्या. या यात्रा महोत्सवादरम्यान महिला, ६५ वर्षांवरील ज्येष्ठ व ७५ वर्षांवरील अमृत नागरिकांना तब्बल ६५ लाख ९६ हजार ७३७ रुपयांची सवलत एसटी महामंडळाच्या वतीने देण्यात आली. यादरम्यान जिल्ह्यातून २१३ बसेसच्या ४१७ फेऱ्या करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील ४० हजार ४७२ विठ्ठलभक्तांनी बसमधून प्रवास केला आहे.
दरवर्षी प्रवाशांच्या सुविधेकरिता एसटी महामंडळाच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त अतिरिक्त बसेसची व्यवस्था करण्यात येते. यंदा जिल्ह्यातील आठ आगारातून अमरावती ते पंढरपूरकरिता १६३ बसेस सोडण्यात आल्या होत्या. याशिवाय पंढरपूर ते पुणे, आळंदीकरिता ३५ आणि रिंगण यात्रेकरिता १५ बसेस सोडण्यात आल्या होत्या. अशा एकूण यात्रा महोत्सवाकरिता २१३ बसेसच्या ४१७ फेऱ्या करण्यात आल्या
विशेष बससेवेतून एसटी महामंडळाला प्रत्यक्षात ५० लाख २६ हजार २५ रुपयांचे मोठे उत्पन्न मिळाले आहे. याशिवाय बसमधून महिलांना व ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत देण्यात आली होती. तर ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास योजनेचादेखील लाभ देण्यात आला. या लाभांशाची किंमत एकून ६५ लाख ६९ हजार ७३७ रुपयांची सवलत या प्रवाशांना योजनेंगतर्गत देण्यात आली आहे. त्यामुळे एसटी महामंडळाला केवळ आषाढी यात्रा महोत्सवापोटी १ कोटी १५ लाख ९५ हजार ७६२ रुपयांचे मोठे उत्पन्न मिळाले आहे. जिल्ह्यातून सुमारे ४० हजार ४७२ विठ्ठलभक्तांनी बसमधून प्रवास केला आहे. याबाबत विभागीय वाहतूक अधिकारी योगेश ठाकरे यांनी माहिती दिली.
४० हजार विठ्ठलभक्तांची पंढरीची वारी
मागील वर्षी आषाढी यात्रा महोत्सवात एसटी महामंडळाने ७८ लाख ९२ हजार ५११ रुपयांची कमाई केली होती. यंदा १ कोटी १५ लाखांच्या घरात उत्पन्न गेले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ३७ लाखांचे उत्पन्न वाढले आहे. यंदा प्रवासी संख्येमध्येदेखील कमालीची वाढ झाली आहे. मागील वर्षी केवळ २४ हजार ९१९ विठ्ठलभक्तांनी बसमधून प्रवास केला होता. यंदा प्रवाशांची संख्या ४० हजारांवर पोहोचली असल्याचे योगेश ठाकरे यांनी सांगितले.