Weather Forecast : महाराष्ट्रासह देशातील 5 राज्यांना आज अतिवृष्टीचा इशारा; IMD कडून रेड अलर्ट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ५ ऑगस्ट ।। ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढलाय. भारतीय हवामान खात्याने आज 5 राज्यांना अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रासह, गोवा, मध्य प्रदेशचा पश्चिम भाग, राजस्थानचा पूर्व भाग, गुजरात तसेच कोकण प्रदेशात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या पाचही राज्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे राजधानी दिल्लीत मात्र, पुढील दोन दिवस दिल्लीत पाऊस पडणार नसल्याचं हवामान विभागाने स्पष्ट केलंय.

आयएमडीने जारी केलेल्या (IMD Rain Alert) ताज्या अंदाजानुसार, येत्या काही दिवसांत केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडूच्या किनारी भागात मुसळधार पाऊस पडू शकतो. याशिवाय ईशान्य भारतात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना देखील पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलाय. मुंबई, कोकणासह पुणे, सातारा, सांगली तसेच कोल्हापुरात विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाडा तसेच विदर्भातील तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना मेघगर्जनेसह तुफान पावसाचा इशारा देण्यात आलाय. नाशिक, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथे आज सोमवारी जोरदार पाऊस (Heavy Rain) पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मुसळधार पावसामुळे पुण्यातील खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय. त्यामुळे नदीकाठच्या गावात पाणी शिरलं असून पूरस्थिती निर्माण झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पुण्यात लष्कराचे जवान तैनात करण्यात आले आहेत .

खडकवासला शिवाय मुळशी, पवना आणि इतर धरणांतून पाणी सोडण्यात येत नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दुसरीकडे नाशिकमध्ये मुसळधार पावसानंतर गोदावरी नदीने धोक्याच्या पातळीजवळून वाहत आहे.

त्यामुळे गोदाकाठच्या गावांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. दरम्यान मध्य प्रदेश, हिमालच प्रदेश, जम्मू काश्मीर, झारखंड, उत्तराखंड आणि गुजरातमध्येही सध्या जोरदार पाऊस पडत आहे.

शनिवारी आणि रविवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे श्रीनगर-लेह राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे. हिमाचल प्रदेशातील 3 जिल्ह्यांमध्ये ढगफुटीमुळे झालेल्या विनाशामुळे मृतांची संख्या 11 वर पोहचली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *