महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ६ ऑगस्ट ।। Electricity in India Update : देशभरात २४ तास सुरळित वीजपुरवठा करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून त्यासाठी केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे. विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागात वीजवितरण व्यवस्था सक्षम करण्यात येत आहे. त्यासाठी देशाच्या वीजनिर्मिती क्षमतेत २०३२ पर्यंत ३.३७ लाख मेगावॉटने वाढ करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी राज्यसभेत दिली.
केंद्र सरकारने देशात सुरळित वीजपुरवठा करण्यासाठी विविध योजना हाती घेतल्या आहेत. दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना, एकात्मिक ऊर्जाविकास योजना आणि प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजनेच्या माध्यमातून १.८५ लाख कोटी खर्च करण्यात आले. त्यातून १८,३७४ खेड्यांचे विद्युतीकरण, तर २.८६ कोटी घरांपर्यंत वीज पोहोचविण्यात आली. त्यानंतर आता देशभरात २४X७ विनाअडथळा वीजपुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारकडून वीजनिर्मिती क्षमता वाढविण्यावर भर दिली जात आहे.
मागील दहा वर्षात देशाच्या वीजनिर्मिती क्षमतेत २.१४ लाख मेगावॉटची भर पडल्याने जून २०२४ पर्यंत देशाची एकूण वीजनिर्मिती क्षमता ४.४६ लाख मेगावॉट इतकी झाली आहे. त्याशिवाय मागील दहा वर्षात वीजवितरण प्रणाली मजबूत करण्यासाठी एक लाख ९५ हजार १८१ किलोमीटरचे जाळे विणले.
राज्यात तीन हजार मेगावॉटचे औष्णिक प्रकल्प उभारणार
राज्याला अखंड वीज पुरवठा व्हावा, म्हणून महानिर्मिती १५ हजार कोटी रूपये खर्चून तीन हजार मेगावॉटचे औष्णिक वीज प्रकल्प उभारणार आहे. सध्या देशात अक्षय ऊर्जानिर्मितीवर भर दिला आहे. त्यामुळे ग्रीडची फ्रिक्वेन्सी राखण्यासाठी औष्णिक वीज आणि जलविद्युत निर्मिती क्षमता तुलनेने कमी दिसत आहे. त्यामुळे केंद्राने देशात ८० हजार मेगावॉट क्षमतेचे औष्णिक प्रकल्प उभारण्याचे निर्देश राज्यांना दिले. त्यानुसार महानिर्मिती कोराडी वीज केंद्रात ६६० मेगावॉटचे दोन संच, तर उर्वरित १६८० मेगावॉटचा प्रकल्प उभारण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
हे वीज प्रकल्पासाठी जवळपास १५ हजार कोटी रूपये खर्च येणार आहे. सदरचा निधी रूरल इलेक्ट्रिफिकेशन कार्पोरेशन आणि पॉवर फायनान्स कार्पोरेशनकडून कर्जरुपाने उभा केला जाणार आहे.
कशी वाढणार वीजनिर्मिती क्षमता? (आकडे मेगावॉटमध्ये)
औष्णिक ८०,०००
जलविद्युत २५,०१०
अणुऊर्जा १४,३००
पंपस्टोरेज ५०,७६०
लघु जलविद्युत ५१०
सौरऊर्जा १,४३,९८०
पवनऊर्जा २३,३४०
एकूण ३,३७,९००