Neeraj Chopra : नीरजचा रौप्यवेध ; सलग दोन ऑलिंपिकमध्ये दोन पदके जिंकणारा तिसरा भारतीय

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ९ ऑगस्ट ।। पॅरिस : भारतीय हॉकी संघाने गुरुवारी सायंकाळी ब्राँझपदक जिंकून गेल्या काही दिवसांपासून पॅरिस ऑलिंपिकमध्ये भारतीयांना हुलकावणी देणाऱ्या ब्राँझपदकाची कोंडी फोडली. त्यानंतर भालाफेकीत गतविजेता असल्याने नीरज चोप्राकडून सुवर्णपदकाचीच अपेक्षा करण्यात येत होती. मात्र, पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ऑलिंपिक विक्रमासह अनपेक्षित सुवर्णपदक जिंकले. नीरजला ८९.५४ मीटर कामगिरीसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

विशेष म्हणजे सहापैकी तो फक्त एकच अधिकृत फेक करू शकला. यामुळे सलग दुसऱ्या ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याच्या त्याच्या अपेक्षांना धक्का बसला. मात्र, आजच्या कामगिरीमुळे तो सलग दोन ऑलिंपिकमध्ये दोन पदके जिंकणारा सुशील कुमार, पी. व्ही. सिंधू यांच्यानंतर तिसरा क्रीडापटू ठरला. मनू भाकरने यंदा दोन पदके जिंकण्याची किमया केली.

अर्शदने ९२.९७ मीटरचा नवीन स्पर्धा विक्रम प्रस्थापित करताना पाकिस्तानला ऑलिंपिकच्या इतिहासात ॲथलेटिक्समध्ये प्रथमच पदक व सुवर्णपदक मिळवून दिले. टोकियोत तो पाचव्या स्थानावर होता. विशेष म्हणजे २०१६ पासून आतापर्यंत अर्शदविरुद्ध नीरजचा हा पहिलाच पराभव होय. अर्शदने नॉर्वेच्या आंद्रेस थोरकिल्डसनने २००८ च्या स्पर्धेत नोंदविलेला ९०.५७ मीटरचा विक्रम इतिहासजमा केला.

या वेळी भारतीयांची सुवर्णपदकाची अपेक्षा नीरज चोप्राच्या खांद्यावर होती. नीरजने मोसमातील सर्वोत्तम फेक केली असली तरी तो अर्शद नदीमचे आव्हान परतवू शकला नाही. २०१६ मध्ये जागतिक ज्युनिअर स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यापासून त्याने प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धेत एक अपवाद वगळता सुवर्णपदकाला कायमच गवसणी घातली आहे. त्यामुळे तो पॅरिसमध्येही प्रबळ दावेदार होता. पात्रता फेरीत आपल्या दावेदारीची झलक त्याने दाखवली होती. यंदा दुखापतीमुळे फक्त तीनच प्रमुख स्पर्धेत त्याला भाग घेता आला. मात्र, या दुखापतीचा लवलेशही अंतिम फेरीत दिसून आला नाही.

नीरजची सुरुवात मात्र निराशजनक झाली. पहिली फेक करताना खाली पडल्यावर त्याचा हात ‘स्क्रॅच लाइन’ला लागल्याने फाउल झाला. पहिल्या फेकीनंतर लंडन ऑलिंपिकमधील विजेता केशॉर्न वॉलकॉट ८६.१६ मीटरसह आघाडीवर होता. त्यानंतर दुसऱ्या फेरीत चांगलीच चुरस पाहायला मिळाली.

माजी विश्वविजेत्या अँडरसन पीटर्सने ८७.८७ मीटर भाला फेकून स्पर्धेतील चुरस आणखी वाढवली. त्यात अर्शद नदीमने ९२.९७ मीटर अंतरावर भाला फेकून नीरजवरील दबाव वाढविला.

नीरजने हे आव्हान स्वीकारताना ८९.४५ मीटरवर भाला फेकून दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. त्यानंतर दूरवर भाला फेकण्याचा प्रयत्न करताना अधिक ताकद लागल्याने नीरजला तिसऱ्या फेकीत अपेक्षित लय गवसली नाही. चौथ्या प्रयत्नातही त्याचा फाउल झाल्याने त्याच्या चेहऱ्यावरील निराशा स्पष्टपणे झळकत होती. पुढील दोन प्रयत्नांतही नीरज अर्शद नदीमला मागे टाकू शकला नाही आणि रौप्यपदकाचा मानकरी ठरला. माजी विश्वविजेत्या अँडरसन पीटर्सला ब्राँझपदक मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *