महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ९ ऑगस्ट ।। अंजीर हे फळ आरोग्यासाठी प्रचंड फायदेशीर आहे. पावसाळ्यात ते आणखी उपयुक्त ठरतं, असे आहारतज्ज्ञ सांगतात. अंजीर सुक्या स्वरूपातही उपलब्ध होते व ते कधीही खाता येते. अंजीरमध्ये आयर्न, कॅल्शियम, पोटॅशियम आणि महत्त्वाचे व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात. या फळांमुळे शरीर ऊर्जावान राहतं. रोगप्रतिकारक शक्तीही कमालीची वाढते.
थंड वातावरणात साथीच्या आजारांपासून शरिराचं रक्षण
अंजीर खाल्ल्यानं शरीरात उब निर्माण होते, म्हणूनच थंड वातावरणात फोफावणार्या साथीच्या आजारांपासून शरिराचं रक्षण होतं. तसंच अंजीरमध्ये भरपूर फायबर असल्यानं पचनसंस्था उत्तम राहते आणि बद्धकोष्ठता दूर होते. अंजीरमध्ये अँटिऑक्सिडंटस् आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात. हे फळ त्वचेसाठीसुद्धा फायदेशीर ठरतं. यामुळे त्वचेतला ओलावा टिकून राहतो आणि नैसर्गिक तेज येतं. अंजीरमध्ये असलेल्या ओमेगा-3, ओमेगा-6 फॅटी अॅसिडस्मुळे कोलेस्ट्रॉलची पातळी उत्तम राहते. ज्यामुळे हृदयविकारांचा धोका कमी होतो.