महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ९ ऑगस्ट ।। मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे मनोज जरांगे यांच्या भूमिकेवर राजकीय नेत्यांकडून टीकाही सुरु केली आहे. याच राजकीय नेत्यांच्या टीकेला मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांचा बोलवत धनी सागर बंगला आहे, असं म्हणज मनोज जरांगे यांनी अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी शांतता यात्रेदरम्यान सांगलीत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. ‘राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर आणि छगन भुजबळ यांचा बोलवता धनी ‘सागर बंगला’ आहे. सागर बंगल्यावरून माणूस खाली आला की बिघाड होतो. सगळ्या समाजाला विनंती करतो. आम्ही नेत्यांच्या नादी लागत नाही. तुम्ही पण नेत्यांच्या नादी लागू नका’, असे ते म्हणाले.
‘आता कोणताच पक्ष नाही. अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहे. वेळ आल्यावर सगळे उमेदवार अपक्ष उभे करणार आहे. पक्षात जसे गट पाडले, तसे मराठा समाजात गट पाडले आहेत. विदर्भ, मराठवाडा, कोकण,पश्चिम महाराष्ट्र मराठा असे निर्माण केले आहेत. पण मराठा एक आहे. आरक्षण नाही दिले तर यांचा महाराष्ट्रात सुफडासाफ होणार आहे. डॉक्टरांनी विश्रातांची सल्ला दिला आहे, पण मी थांबणार नाही, असे जरांगे पाटील यांनी सांगितले.
‘जेवढ्या राखीव जागा असतील, तिथे मराठा एक गठ्ठा मतदान करतील. जे आमच्या विचारांचे असतील. EWS रद्द करू नये,अशी मागणी होती. नेते विरोध करत आहेत. कोणताही समाज मराठा आरक्षणला विरोध करत नाही. दुरावा हा गाव खेड्यात नाही. एकमेकांना देवाण-घेवाण करावी लागते. सुख दुःखात आम्ही सोबत असतो,असे जरांगे पाटील पुढे म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली
‘मनोज जरांगे पाटील यांची तब्येत काहीशी बिघडली आहे. चक्कर आणि अस्वस्थ वाटू लागल्याने डॉक्टरांनी मनोज जरांगे पाटील यांची तपासणी केली. तपासणीनंतर आता तब्येत व्यवस्थित असल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला आहे.