महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ९ ऑगस्ट ।। टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि एकेकाळी ‘भारतरत्न’ सचिन तेंडुलकर याचा संघातील सहकारी असणाऱ्या विनोद कांबळी याचा एक व्हिडीओ गेल्या आठवड्यात सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला होता. या व्हिडीओ विनोद कांबळीची अवस्था अत्यंत बिकट असल्याचे दिसत होते. दुचाकीवरून उतरल्यानंतर विनोद कांबळीचे पाय थरथरत होते. त्याला चालण्यासाठीही लोकांचा आधार घ्यावा लागत होता. यामुळे क्रीडाप्रेमींना त्याच्या तब्येतीची चिंता वाटत होती. आता या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर विनोद कांबळीने स्पष्टीकरण दिले आहे.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये विनोद कांबळी एका बुलेटच्या आधाराने उभा असल्याचे दिसते. त्यानंतर तो चालण्याचा प्रयत्न करतो, मात्र त्याचे पाय थरथरू लागतात. त्यामुळे त्याला लोकांचा आधार घ्यावा लागतो. दोन-तीन लोकांच्या आधाराने त्याला जवळच्या इमारतीमध्ये जावे लागतेय. या व्हिडीओमध्ये कांबळी आजारी असल्याचे दिसत होते. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून लोकं विनोद कांबळीच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त करत होते. तसेच बीसीसीआय, सचिन तेंडुलकर आणि इतर खेळाडूंनीही त्याला मदत करावी अशी मागणीही सोशल मीडियावर जोर धरू लागली होती. मात्र आता यावर कांबळीने स्पष्टीकरण दिले असून हा व्हिडीओ जुना असल्याचे म्हटले आहे.
मी ठणठणीत!
‘हिंदुस्थान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विनोद कांबळीचे मित्रही सैरभैर झाले आणि मित्राचा हालहवाला जाणून घेण्यासाठी त्याच्या घरी पोहोचले. यावेळी कांबळी ठणठणीत असल्याचे दिसून आले. कांबळीने त्याचा शाळकरी मित्र रिकी आणि प्रथमश्रेणी क्रिकेटमधील पंच मार्कस यांच्यासोबत बराच काळ घालवला आणि जुन्या दिवसांवर गप्पाही मारल्या. यावेळी त्याने सोशल मीडियावर विश्वास ठेऊ नका, असे आवाहनही केले.
व्हिडीओ जुना
दरम्यान, आमच्या भेटीदरम्यान त्याचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. त्याच्या प्रकृतीत सुधारणा झालेली असून सदर व्हिडीओ जुना आहे. त्याने आता वजनही कमी केले आहे. तसेच त्याला भूकही चांगली लागत असून या भेटीवेळी संपूर्ण कुटुंब एकत्र आले होते. त्याचा मुलगा क्रिस्टियाने हा डावखुरा फलंदाज असूनतो वडिलांकडूनच फलंदाजीचे मार्गदर्शन घेत आहे, अशी माहिती मार्कस यांनी दिली.