महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ९ ऑगस्ट ।। गेल्या काही दिवसांच्या घसरणीचा कल मागे टाकून भारतासह जगभरातील शेअर बाजार आता रिकव्हरी मोडमध्ये आले आहेत. गेल्या काही दिवसांत झालेल्या घसरणीचा टाटा समूहातील दिग्गज ऑटो कंपनी, टाटा मोटर्सच्या शेअर्सनाही मोठ्या प्रमाणात तोटा झाला जो आता लवकरच भरून निघेल असं दिसत आहे. टाटा समूहाच्या दिग्गज कंपन्यांपैकी टाटा मोटर्सचे शेअर्स आज मागील काही दिवसांपासून फोकसमध्ये होते.
गुरुवारी मंदीच्या बाजारातही इंट्रा-डे ट्रेडिंगमध्ये टाटा मोटर्स लिमिटेडचे शेअर्स जवळपास ३% वाढून बीएसईवर १,०५६.१० रुपयांवर पोहोचले असून यामागे मोठे कारण आहे. जागतिक रेटिंग एजन्सी मूडीजने टाटा मोटर्सचे कॉर्पोरेट फॅमिली रेटिंग Ba3 वरून Ba1 पर्यंत वाढवले असून रेटिंग एजन्सीनेही सर्व रेटिंगबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यामुळे शेअर्समध्ये तेजीची हिरवळ दिसत आहे.
टाटा समूहाचा शेअर जोमात
दुपारी २ वाजताच्या सुमारास टाटा मोटर्सचे शेअर्स बीएसईवर सुमारे २.१५% वाढीसह १,०५० रुपयांच्या जवळ व्यवहार करत होते तर इंट्राडे मध्ये रु. १,0०५६.४० पर्यंत यशस्वी मजल मारली. पण स्टॉक अजूनही त्याच्या उच्चांकापेक्षा ११% खाली ट्रेंड करत आहेत. टाटा मोटर्सच्या शेअर्सचा उच्चांक १,१७९ रुपये असून सध्या स्टॉक नीचांकीपेक्षा ८० टक्क्यांनी वधारला आहे. टाटा मोटर्स शेअरची नीचांकी किंमत ५९३.३० रुपये आहे.
टाटांच्या शेअरवर ब्रोकरेजचा मूड बदलला
अलीकडेच ब्रोकरेज फर्म नोमुराने टाटा मोटर्सच्या शेअरला ‘बाय’ रेटिंग दिले आणि १,२९४ रुपये लक्ष्य किंमत निश्चित केली. तसेच, Elara कॅपिटलने टाटा मोटर्सला १,३०० रुपये लक्ष्य मूल्यासह ‘Accumulate’ रेटिंग दिले असून ब्रोकरेज फर्मच्या विश्लेषकांनुसार पायाभूत सुविधांमध्ये सतत गुंतवणूक, मुबलक मान्सून, अनुकूल मॅक्रो आणि सणासुदीच्या मागणीमुळे देशांतर्गत मागणी हळुहळू सुधारेल.
त्याचवेळी, क्रेडिट रेटिंग एजन्सी मूडीजने एक दिवसापूर्वी टाटा मोटर्सचे रेटिंग अपग्रेड केले आणि टाटा मोटर्सचे कॉर्पोरेट कौटुंबिक रेटिंग Ba3 वरून Ba1 पर्यंत दोन अंकांनी वाढवले. कंपनीच्या कार्यपद्धती अधिक चांगल्या असल्याचे मूडीजने म्हटले असून ब्रोकरेजने टाटा मोटर्सच्या रेटिंगबाबत आपला सकारात्मक दृष्टिकोन कायम ठेवला.
टाटा मोटर्सचे तिमाही निकाल
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत टाटा मोटर्सचा एकत्रित निव्वळ नफा ७४% वाढून ५,५६६ कोटी रुपये झाला जो गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत ३,२०३ कोटी होता. याशिवाय कंपनीने म्हटले की एकूण उत्पन्न मागील आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत १,०३,५९७ कोटींच्या तुलनेत वाढून १,०९,६२३ कोटी रुपये झाले आहे. तसेच समीक्षाधिक कालावधीत टाटा मोटर्सचा स्टँडअलोन निव्वळ नफा रु. २,१९० कोटी होता, जो मागील वर्षीच्या याच तिमाहीत ६४ कोटी होता. कंपनीचे एकूण उत्पन्न आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या पहिल्या तिमाहीत १८,८५१ कोटी रुपये झाले, जे गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत १६,१३२ कोटी रुपये होते.