महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ११ ऑगस्ट ।। उद्धव ठाकरे यांच्या ठाण्यातील सभेवेळी शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. मनसे कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर नारळ तसेच शेण फेकले. या हायहोल्टेज ड्राम्यानंतर राजकीय वर्तुळातून जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रकरणावर बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर पुन्हा हल्लाबोल केला आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
“काल ठाण्यामध्ये शेकडो शिवसैनिकांच्या उपस्थितीत भगवा सप्ताह जल्लोषात पार पडला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे ठाण्यात येताना जागोजाग स्वागत झाले. भरगच्च सभागृह होता, भगवा सप्ताह त्यानुसार ठाण्यात साजरा झाला. काय झालं हे मला माहित नाही ते कोणाचे कार्यकर्ते होते. ते दिल्लीच्या अब्दुल शहा अब्दालीचे लोक होते,” असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला.
मनसे कार्यकर्त्यांना इशारा
“बीडमध्ये मनसे प्रमुखांच्याबाबत जो प्रकार झाला त्याचा शिवसेना पक्षाशी संबंध नव्हता, शिवसेना म्हणून ती भूमिका नव्हती. पण काल ॲक्शन रिएक्शन करण्याचा प्रयत्न झाला असेल तर माझी त्यांना हात जोडून विनंती आहे पक्षातर्फे की, तुम्ही काळोखाचा फायदा घेऊन काही फेकला असेल म्हणून तुम्ही वाचला. मर्दांची अवलाद असता तर समोर येऊन केलं असतं,” अशी टीका संजय राऊत यांनी केली.
तसेच “माझी त्यांनी हात जोडून विनंती आहे की, पुन्हा असे कृत्य काळोखात अंधारात, लपून, लांबून, फेकाफेकीचे कृत्य करू नका तुमच्या घरात तुमच्या आई-वडील, मुलबाळं वाट पाहतात. अहमद शहा अब्दाली सुपारी देऊन मजा बघत आहे. महाराष्ट्रात असा गोंधळ निर्माण करण्यासाठी तीन मोठ्या नेत्यांना सुपारी दिली आहे. ज्या कशा वाजवल्या जातात, हे आपण कालं पाहिलं,” असा घणाघात संजय राऊत यांनी केला.