Weather Update : राज्यासह देशात या भागात आज मुसळधार पाऊस ; हवामान खात्याचा अलर्ट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ ऑगस्ट ।। आठवडाभराच्या विश्रांतीनंतर महाराष्ट्रासह देशभरात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालं आहे. आज मंगळवारपासून येत्या रविवारपर्यंत अनेक भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे. यापार्श्वभूमीवर काही राज्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात आलाय. खबरदारीचा उपाय म्हणून अनेक भागात शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, दक्षिण भारतासह उत्तर भारत, मध्य आणि पूर्व भागात आज मंगळवारी मुसळधार पाऊस पडणार आहे. सततच्या पावसामुळे (Heavy Rain) उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात पुराचा धोका निर्माण झालाय. यापार्श्वभूमीवर दोन्ही राज्यातील रेड अलर्ट असलेल्या जिल्ह्यांमधील शाळा तसेच कॉलेजला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

राजस्थानमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
राजस्थानमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पुराची भीती वाढली आहे. येत्या काही दिवसांत राज्यात मुसळधार पावसाचा इशारा (Rain Alert) हवामान खात्याने दिला आहे. सततच्या पावसाने पाणी साचण्याच्या समस्येने राज्यातील जनतेचे मोठे हाल होत आहेत. राज्यात पूर आणि पावसामुळे 24 तासांत 16 जणांचा मृत्यू झाला आहे.

हिमाचल प्रदेशात अतिवृष्टीमुळे 338 रस्ते बंद
रविवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशात भूस्खलनाच्या घटना घडल्या. अचानक आलेल्या पुरामुळे राज्यातील 4 राष्ट्रीय महामार्गांसह 338 रस्ते बंद झाले आहेत. कुल्लू, मंडी आणि शिमला जिल्ह्यात 31 जुलै रोजी आलेल्या पुरानंतर बेपत्ता झालेल्या सुमारे 30 जणांना शोधण्यासाठी बचावकार्य सुरू असल्याची माहिती आहे. आतापर्यंत पावसामुळे 100 जणांचा मृत्यू झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

आज या राज्यांना पावसाचा इशारा
हवामान खात्याने आज राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश, आसाम, मेघालय, तामिळनाडू, पुद्दुचेरी, दक्षिण कर्नाटक, केरळ, हिमाचल, उत्तराखंड, कर्नाटक, मेघालय, मणिपूर, नागालँड आणि सिक्कीमच्या काही भागात मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. महाराष्ट्रातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भ तसेच मराठवाडा आणि मुंबईसह कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *