![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ ऑगस्ट ।। देशातील किरकोळ (रिटेल) महागाई जुलै महिन्यात घसरून ३.५४ टक्के नोंदवली गेली आहे. महागाईची ही टक्केवारी रिझर्व्ह बँकेने निर्धारित केलेल्या ४ टक्के या सहन करण्याजोग्या महागाईपेक्षा कमी नोंदवली गेली आहे. यापूर्वी ४ टक्क्यांपेक्षा कमी रिटेल महागाई यापूर्वी ऑगस्ट २०१९मध्ये होती. याचा अर्थ, पाच वर्षांनंतर प्रथमच रिटेल महागाई खाली आली आहे.
जून महिन्यात किरकोळ (रिटेल) महागाई वाढून ५.०८ टक्क्यांवर पोहोचली. खाद्यपदार्थांच्या किंमती वाढल्यामुळे महागाई दर वाढला. गेल्यावर्षी, जुलै २०२३ मध्ये ही महागाई ७.४४ टक्क्यांवर गेली होती. त्यावेळी ती १५ महिन्यांच्या उच्चांकी पोहोचली होती.
ग्रामीण महागाई दर जुलै महिन्यात ४.१० टक्के झाला. हा दर जून महिन्यात ५.६६ टक्के होता, तर जुलै २०२३मध्ये तो ७.६३ टक्के झाला. शहरी महागाई दर जूनमध्ये ४.३९ टक्के होता, जो जुलैमध्ये २.९८ टक्के झाला. जुलै महिन्यात गेल्यावर्षी शहरी महागाई दर ७.२ टक्के नोंदवला गेला होता.
रिझर्व्ह बँकेने नुकत्याच सादर केलेल्या पतधोरणाच्या द्वैमासिक आढाव्यात चालू आर्थिक वर्षासाठी ४.५ टक्के किरकोळ महागाई असेल, असा अंदाज वर्तवला आहे. त्याचवेळी खाद्यपदार्थांमध्ये महागाई वाढू शकते असा इशाराही दिला आहे. या आढाव्यात रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही.
