Mumbai-Pune Railway: रेल्वेनी लोणावळ्याशिवाय पुणे गाठता येणार ; मुंबई-पुणेदरम्यान ….

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ ऑगस्ट ।। मुंबई आणि पुणे दरम्यानचा रेल्वे प्रवास वेगवान आणि आरामदायी होण्यासाठी मध्य रेल्वेने चाकोरीबाहेरील उपायांवर काम सुरू केले आहे. कर्जत ते तळेगाव (७२ किमी) आणि कर्जत ते कामशेत (६२ किमी) हे दोन नवे रेल्वे मार्ग तयार करण्याचा मध्य रेल्वेचा प्रस्ताव आहे. नव्या मार्गामुळे लोणावळा टाळून रेल्वे प्रवाशांना पुणे गाठता येणार आहे. नव्या मार्गावर मेल-एक्स्प्रेसचा वेग दुप्पट होईल, शिवाय नव्या १० रेल्वेगाड्या चालवण्याचा पर्यायही खुला होणार आहे.


मुंबई-पुणेदरम्यान रेल्वे मार्गात लोणावळा-खंडाळा घाट आहे. प्रवासी सुरक्षिततेमुळे घाटात ताशी ६० किमी अशी वेगमर्यादा मेल-एक्स्प्रेसला आहे. नव्या मार्गावर घाट नसल्याने रेल्वेगाड्या ताशी ११० किमी वेगाने धावू शकणार आहेत. दोन्ही मार्गांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यापैकी एक मार्ग मंजूर झाल्यावर त्याचे काम सुरू करण्यात येईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

कर्जत ते तळेगावदरम्यान ७२ किमीच्या नव्या मार्गावर घाटातील ग्रेडियंट (चढ-उताराची तीव्रता) १.१०० होणार आहे. सध्या लोणावळा घाटात १.३७ ग्रेडिएंट होणार आहे. यामुळे अतिरिक्त इंजिन जोडण्याची गरज भासणार नाही. कर्जत ते तळेगाव अंतर ५७ किमी असून, नव्या मार्गात अंतर ७२ किमीपर्यंत पोहोचेल, कर्जत ते कामशेत दरम्यान सध्या ४४ किमी असून, नव्या मार्गानुसार ६२ किमी असणार आहे. घाटाऐवजी पर्वतरांगांना वळसा घालावा लागणार असल्याने नव्या मार्गात अंतर अधिक आहे.

पनवेल परिसरात मेगा टर्मिनसचे नियोजन असून, कल्याण यार्डचे पुर्नप्रारूपीकरणाचे काम सध्या सुरू आहे. लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये (एलटीटी) नवे फलाट उभारण्यात येणार आहेत. पनवेल, कल्याण आणि एलटीटी स्थानकातून पुण्यापर्यंत १० नव्या मेल-एक्स्प्रेस सुरू करण्यासाठी पुरेशी जागा निर्माण होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधून सध्या पूर्ण क्षमतेने रेल्वेगाड्या धावत असल्याने नव्या मेगा टर्मिनसची उभारणी करण्यात येत आहे.

मुंबई-पुणेदरम्यान रोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. मुंबई-पुणेदरम्यान १९२ किमीचे अंतर असून, या मार्गावर एकूण ४४ रेल्वेगाड्या धावतात. त्यापैकी २३ रेल्वेगाड्या रोज धावणाऱ्या असून उर्वरित रेल्वेगाड्या साप्ताहिक, द्विसाप्ताहिक आणि त्रैसाप्ताहिक स्वरूपात आहे.

लोणावळा-खंडाळा घाटावर जाण्यापूर्वी आणि घाट उतरल्यानंतर कर्जत स्थानकात बॅंकरची (अतिरिक्त इंजिन) आवश्यकता भासते. बँकर हाताळण्यासाठी किमान १५-२० मिनिटांचा वेळ लागतो. नव्या मार्गावर घाट नसल्याने हा वेळ वाचणार असून यांमुळे प्रवाशांच्या प्रवास वेळेतही घट होणार आहे, असे प्रस्तावात स्पष्ट केले आहे.

खर्च किती?
प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतर चार वर्षांत प्रकल्प पूर्ण होईल. कर्जत ते तळेगाव नव्या मार्गासाठी १६,००० कोटी आणि कर्जत ते कामशेत नव्या रेल्वे प्रकल्पासाठी १०,२०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *