Electricity Bill : वीज दरवाढीचा सामान्य ग्राहकाला शॉक ; खिशाला बसतोय फटका

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ ऑगस्ट ।। महावितरण कंपनीने चालू आर्थिक वर्षात विजेची मोठी दरवाढ करून सर्वसामान्य ग्राहकांना एकप्रकारे ‘शॉक’च दिला आहे. दरवाढीमुळे ग्राहकांच्या खिशाला फटका बसत आहे. झालेली दरवाढ परवडत नसल्याने सामान्य ग्राहक हतबल झाला असून वीज दरवाढ कमी करावी, अशी मागणी होत आहे.

मागील काही वर्षांपासून महागाईने उच्चांक गाठला आहे. सर्वसामान्यांना हातातोंडाचा मेळ बसविणे अवघड झाले असतानाच महावितरण कंपनीने दरवाढ करून आणखी मोठा झटका दिला आहे. प्रत्येकाला हवी असणारी वीज युनिटची किंमत आवाक्याच्या बाहेर पोचली आहे.

वीज बिल परवडत नसल्याने अनेकांकडे थकबाकी थकली आहे. मात्र, काही नागरिक पोटाला चिमटा घेऊन केलेली कमाई वीज बिल भरण्यामध्येच घालत आहेत. त्यामुळे राज्य शासनाने वाढलेल्या वीज दरात कपात करून सामान्य ग्राहकांना दिलासा देण्याची गरज आहे.

एकीकडे वीज दरवाढ केली असली तरी दुसरीकडे मात्र ग्राहकांना सेवा देण्याकडे महावितरण कंपनीचे दुर्लक्ष होत आहे. मागील पंधरा दिवसांपासून शहरासह तालुक्यात विजेचा खेळखंडोबा झाला आहे. सातत्याने वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे.

दोन दिवसांपूर्वीच शहरासह अनेक गावांतील तब्बल ११ तास वीजपुरवठा खंडित झाला होता. सुरळीत वीजपुरवठा होत नसल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. वीजपुरवठा सुरळीत करण्यावर भर देऊन वीज दरात कपात करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

एका युनिटला मोजावे लागतात दहा रुपये
ता. एक एप्रिलपासून वीज दरवाढ केली आहे. सध्या शंभर युनिटपर्यंत चार रुपये ७१ पैसे, १०१ ते ३०० युनिटपर्यंत दहा रुपये २९ पैसे, ३०१ ते ५०० युनिटपर्यंत १४ रुपये ५५ पैसे, ५०१ ते एक हजार युनिटपर्यंत १६ रुपये ६४ पैसे, तर एक हजार युनिटच्या पुढे १६ रुपये ६४ पैसे एका युनिटला भरावे लागत आहेत.

त्यासोबतच वहन आकार एका युनिटला एक रुपया १७ पैसे, इंधन समायोजन आकार एका युनिटला ४० पैसे, वीज शुल्क जे की महाराष्ट्र शासनाला भरला जाणार कर तो १६ टक्के इतका असून या सर्व बाबींमुळे अंदाजे जवळपास दहा रुपये एका युनिटला वीज बिल सर्वसामान्यांना भरावे लागत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *