महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ ऑगस्ट ।। पुण्यातील भाजपचे माजी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांच्यावर सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये राजेंद्र शिळीमकर यांच्यासह त्यांचा मुलगा अथर्व शिळीमकर, पुतण्या अर्चित शिळीमकर आणि महेश शिळीमकर अशा चौघांचा समावेश आहे.
शंकर महाराज मठात रूद्रअभिषेक करण्यासाठी मज्जाव करत, शिळीमकर यांनी मारहाण केल्याप्रकरणी चेतन आरडे यांचे उपोषण सुरू होत. या उपोषणाची दखल घेत पोलिसांकडून शिळीमकर पिता पुत्र पुतण्यांवर कारवाई केली आहे.
शंकर महाराज मठात रूद्रअभिषेक करण्याकरीता मज्जाव करत, अश्लील आणि जातीवाचक शिवीगाळ करत व बेदम मारहाण केल्याचा आरोप शिळीमकरांवर आहे. या प्रकरणी पीडित चेतन आरोडे गेल्या पाच दिवसांपासून पुणे समाज कल्याण विभागासमोर उपोषणास बसले होते. त्यानंतर पोलिसांनी कारवाईची पाऊले उचलली.
शंकर महाराज मठात काय घडलं?
चेतन आरडे हे मातंग समाजातील असून, तळजाई वसाहत येथे वास्तव्यास आहेत. 20 जून 2024 रोजी सातारा रोड येथील शंकर महाराज मठामध्ये आरडे हे दर्शनासाठी गेले असता त्या ठिकाणी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ ही आले होते.
मोहोळ यांच्यासाठी रुद्राभिषेक चालू होता. रुद्राभिषेक सुरू असताना आरडे यांनाही आत जायचे होते. परंतु नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांचे बंधू महेश शिळीमकर, अथर्व राजेंद्र शिळीमकर, अर्चित महेश शिळीमकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी जातीय द्वेषातून चेतन यांना मारहाण केली, असा आरोप आहे.