Weather Alert : महाराष्ट्रासह २४ राज्यांमध्ये पुढील ७ दिवस मुसळधार पाऊस; IMD कडून सतर्कचा इशारा, वाचा वेदर रिपोर्ट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ ऑगस्ट ।। देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या पावसाची संततधार सुरु आहे. उत्तराखंड, राजस्थान, तामिळनाडू आणि केरळला पावसाने अक्षरश: झोडपून काढलंय. मुसळधार पावसामुळे उत्तराखंडमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातही पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. अशातच आजपासून पावसाचा जोर वाढणार, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

आयएमडीच्या माहितीनुसार, ईशान्य आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये पावसाने अक्षरश: कहर केला आहे. मंगळवारी पूर्व राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस (Heavy Rain) झालाय. त्यामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. जम्मू काश्मीरमध्ये सुरु असलेल्या पावसामुळे बालटाल आणि पहलगाम या दोन्ही मार्गांवरून अमरनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे.

हिमाचलमध्ये अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्यामुळे राष्ट्रीय महामार्गासह 213 रस्त्यांवर वाहनांची वाहतूक बंद आहे. उत्तराखंडमध्येही रस्त्यांवर डोंगर कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. पुढील ७ दिवस या राज्यांमध्ये पावसाची अशीच स्थिती राहील, असा अंदाज हवामान खात्याने (IMD Rain Alert) वर्तविला आहे.

कोणकोणत्या राज्यात कोसळणार पाऊस?
पश्चिम हिमालयीन प्रदेशापासून पूर्व, ईशान्य आणि दक्षिणेपर्यंत अनेक राज्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पूर्व राजस्थान, उत्तराखंड, पूर्व उत्तर प्रदेश, आसाम, मेघालय, केरळ आणि तामिळनाडूमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, झारखंडमध्येही पावसाचा इशारा देण्यात आलाय.

दुसरीकडे महाराष्ट्रासह गोवा, गुजरातचा बराच प्रदेश, पश्चिम राजस्थान, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा तसेच पश्चिम मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगाल तुफान पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रातील विदर्भ मराठवाड्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार, असं भारतीय हवामान खात्याने सांगितलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *