महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १६ ऑगस्ट ।। चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते जुलै या काळात सोन्याच्या आयातीत ४.२३ टक्के घसरण होऊन या चार महिन्यांत १२.६४ अब्ज डॉलरचे सोने आयात केले गेले आहे. जागतिक अशांततेमुळे सर्वसामान्यांचा कल सोन्यातील गुंतवणूक वाढवण्याकडे आहे. देशाच्या चालू खात्यातील तूट मोजताना सोन्याची आयात ही महत्त्वाची भूमिका बजावत असल्यामुळे एप्रिल ते जुलै या काळात सोन्याची आयात कमी झाल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.
एप्रिल ते जुलै २०२३ या मागील वर्षात १३.२ अब्ज डॉलरचे सोने आयात करण्यात आले होते. केवळ जुलै महिन्यात सोन्याची आयात १०.६५ टक्के घसरून ३.१३ अब्ज डॉलरचे सोने देशात आणले गेले. गेल्यावर्षी जुलै महिन्यात ३.५ अब्ज डॉलरचे सोने खरेदी केले गेले होते. जूनमध्ये सोन्याची आयात उणे ३८.६६ टक्के आणि मे महिन्यात उणे ९.७६ टक्के झाली होती. एप्रिलमध्ये मात्र सोन्याच्या आयातीत वाढ होऊन ३.११ अब्ज डॉलरचे सोने खरेदी केले गेले. एप्रिल २०२३मध्ये एक अब्ज डॉलरचे सोने देशात आणले गेले होते.
देशाच्या विविध प्रकारच्या आयातीत सोन्याची आयात एकूण आयातीच्या ५ टक्के आहे. एप्रिल ते जुलै या काळात सोन्याची आयात कमी झालेली असली, तरी आयात व निर्यात यांमधील फरक अर्थात व्यापारी तूट मात्र जुलै महिन्यात विस्तारून २३.५ अब्ज डॉलर झाली आहे. ही तूट चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या चार महिन्यात ही तूट ८५.५८ अब्ज डॉलर नोंदवली गेली आहे.