महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ ऑगस्ट ।। महाराष्ट्रासह संपूर्ण देशातच मान्सूनची गती मंद झाल्याने चक्क ऑगस्ट महिन्यातच ऑक्टोबर हीट जाणवत आहे. राज्याच्या कमाल तापमानात तब्बल 8 ते 10 तर किमान तापमानात 4 ते 6 अंशांनी वाढ झाल्याने प्रचंड उकडा जाणवत आहे. ही स्थिती 25 ऑगस्टपर्यंत जाणवणार आहे. त्यामुळे या काळात पिकांची काळजी घ्यावी, असा सल्ला हवामानतज्ज्ञांनी दिला आहे.
संपूर्ण देशातच मान्सून सध्या सुटीवर गेला आहे. त्यामुळे तुरळक भागातच पाऊस सुरू आहे. देशाच्या बहुतांश भागांत कमाल तापमानाचा पारा 34 ते 37 अंशांवर गेला आहे, तर महाराष्ट्राचा पारा 32 ते 34 अंशांवर गेल्याने ऑगस्टमध्येच ऑक्टोबर हीट जाणवत आहे. अशा वेळी पिकांना पाण्याची पाळी द्यावी लागेल, असा सल्ला हवामानतज्ज्ञांनी दिला आहे.
विषुववृत्तीय परिक्षेत्रात वाढली उष्णता
हिंदी महासागरावरील विषुववृत्तीय परिक्षेत्रात उष्णता वाढली आहे. त्यामुळे 25 ऑगस्टपर्यंत राज्यात कमाल व किमान तापमानात वाढ राहणार आहे. राज्यातील 25 ते 28 जिल्ह्यांत दुपारचे तापमान 32 ते 34 अंशांवर जाईल. या प्रकाराला उष्णता संवाहिनी असे शास्त्रीय नाव दिले आहे.
राज्यात सर्वत्र तापमानाचा पारा सरासरीपेक्षा 6 ते 7 अंशांनी जास्त आहे. सरासरी कमाल तापमान 32 ते 34, तर किमान तापमानाचा पारा 24 ते 28 अंशांवर गेला आहे. आत्तापर्यंतच्या चांगल्या स्थितीतील पिकांना पाण्याचा ताण बसू शकतो. तसेच, किडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. प्रचंड उकाड्यामुळे तयार झालेल्या उष्णतेमुळे राज्याच्या काही भागांत 17 ते 20 ऑगस्टदरम्यान विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल.
– माणिकराव खुळे, निवृत्त हवामानशास्त्रज्ञ, आयएमडी, पुणे
देशातील तापलेली शहरे
अलाहाबाद : 35.7,
अनंतपूर (आंध— प्रदेश) : 37.9,
कडप्पाः 37.6,
करनूल : 37.3,
लखनौ : 34.7,
मदुराई : 35.2