Sharad Pawar News: ‘…तर मी स्वतः आंदोलनात सहभागी होणार’, MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी शरद पवार मैदानात; राज्य सरकारला इशारा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२२ ऑगस्ट ।। पुण्यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी ठेवण्यात आल्याने विद्यार्थ्यांची कोंडी झाली आहे. त्यामुळे २५ तारखेची परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. या विद्यार्थी आंदोलनाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाठिंबा देत सरकारला इशारा दिला आहे.

काय म्हणालेत शरद पवार?
पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करणं सरकारचं कर्तव्य आहे. परंतु सत्ताधारी याला गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. उद्यापर्यंत यावर सरकारने योग्य भूमिका स्पष्ट केली नाही तर पुण्याच्या आंदोलनस्थळी मी स्वतः आंदोलनात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार आहे, असा इशारा शरद पवार यांनी दिला आहे.

सुप्रिया सुळे यांनी घेतली होती आंदोलकांची भेट!
काल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही पुण्यामध्ये आंदोलनस्थळी जाऊन एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. यावेळी सुप्रिया सुळे यांनी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांशी चर्चा करत आंदोलनाला पाठिंबा दिला होता. तसेच याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे आश्वासनही त्यांनी विद्यार्थ्यांना दिले होते.

परीक्षेची वेळ बदलण्याची शक्यता, देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली असून आज यासंदर्भात त्यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही 25 ऑगस्ट रोजी एकाच दिवशी आल्या आहेत. तसेच कृषी विभागाच्या 258 जागांचा समावेश राज्य सेवा पूर्व परीक्षेत झालेला नाही. या दोन्ही कारणांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे, त्यामुळे याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *