महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २३ ऑगस्ट ।। फुटबॉल जगतातील स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो मैदानात उतरला की, त्याच्या रेकॉर्डवर नजरा असतात. एवढेच नाही तर त्याला संघात घेण्यासाठी अमाप पैसा खर्च करणारे फुटबॉल क्लबची कमी नाही. कारण हा खेळाडू लोकप्रियतेची हमी आहे. आता रोनाल्डोनं मैदानाबाहेर केलेल्या रेकॉर्डची चर्चा आहे. पोर्तुगालच्या ३९ वर्षीय रोनाल्डोनं युट्यूब चॅनेलवर अगदी दाबात एन्ट्री मारलीये.
रोनाल्डोनं मैदानाबाहेर सेट केला खास विक्रम
रोनाल्डोनं UR Cristiano या नावाने आपलं YouTube चॅनेल लॉन्च केले आहे. तो युट्यूब चॅनेलवर येताच एक नवा विक्रम त्याच्या नावे झाला आहे. काही तासांतच त्याने १० मिलियनचा आकडा गाठला. हा एक रेकॉर्डच आहे. युट्युबवर चॅनेल काढल्यावर सबस्क्राईबर मिळवण्यासाठी अनेकजणांना मोठी कसरत करावी लागते. पण रोनाल्डोची लोकप्रियताच इतकी तुफान आहे की, ज्यासाठी लोक आयुष्यभर झटतात ते त्याने काही क्षणात करून दाखवलं आहे.
A present for my family ❤️ Thank you to all the SIUUUbscribers! ➡️ https://t.co/d6RaDnAgEW pic.twitter.com/keWtHU64d7
— Cristiano Ronaldo (@Cristiano) August 21, 2024
सात दिवसांत सेट झालेला वर्ल्ड रेकॉर्ड फक्त एका दिवसांत मोडला
रोनाल्डोनं युट्युब चॅनेल लॉन्च केल्यानंतर पार्टनर जॉर्जिना रॉड्रिग्जसह मजेदार क्विझ गेमसह अन्य काही खास व्हिडिओ क्लिप शेअर केल्या आहेत. रोनाल्डोच्या या नव्या चॅनेलने ९० मिनिटांपेक्षा कमी काळात एक मिलियनपेक्षा अधिक फॉलोअर्स कमावले. त्यामुळे त्याला युट्युबवर सर्वात वेगाने १० मिलियनचा टप्पा अगदी २४ तासांत गाठणं सहज शक्य झाले. यासह रोनाल्डोच्या चॅनेलनं लोकप्रिय ठरलेल्या हॅमस्टर कॉम्बॅट व्हायरल टॅप-टू-अर्न गेम चॅनेलचा विक्रम मोडीत काढला. हॅम्स्टर कोम्बॅटनं ७ दिवसांत हा टप्पा गाठला होता. हा विक्रम रोनाल्डोनं अवघ्या एका दिवसांत मागे टाकला.
सोशल मीडियावरील प्रत्येक प्लॅटफॉर्मवर दिसते त्याचीच हवा!
सोशल मीडियावरील प्रत्येक प्लॅटफॉर्मवर अधिराज्य गाजवणाऱ्या खेळाडूंमध्ये रोनाल्डो आघाडीवर असल्याचे दिसून येते. X वर त्याच्या फॉलोअर्सचा आकडा हा ११२.५ मिलियन इतका आहे. फेसबुकवर त्याला १७० मिलयन चाहते फॉलो करतात. इन्स्टाग्रामवर त्याने ६३६ मिलियन फॉलोअर्स कमावले आहेत. आता त्यात युट्युब चॅनेलची भर पडलीये. इथंही तो सर्वांत आघाडीवर पोहचला आहे.