महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २४ ऑगस्ट ।। भारताचा स्टार क्रिकेटपटू शिखर धवनने अंतरराष्ट्रीय तसेच घरगुती क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत यासंदर्भातील माहिती दिली. भारतीय संघामध्ये शिखर धवन गब्बर म्हणून ओळखला जायचा.
आयपीएलबद्दल संभ्रम
इंडियन प्रिमिअर लीगच्या 2024 च्या पर्वामध्ये शिखर धवन पंजाब किंग्ज इलेव्हनच्या संघाकडून खेळताना दिसला होता. मात्र दुखापतीमुखे त्याला अनेक सामने खेळता आले नव्हते. अर्थात शिखर धवन 2025 च्या आयपीएलमध्ये खेळताना दिसू शकतो. कारण आयपीएलमधून निवृत्तीचा कोणताही उल्लेख त्याने व्हिडीओमध्ये केलेला नाही. म्हणजेच धवन यापुढे भारतीय संघाच्या जर्सीबरोबरच देशांतर्गत स्पर्धांमध्ये दिसणार नाही. तो आयपीएलमध्ये खेळताना दिसू शकतो.
काय म्हटलंय व्हिडीओमध्ये?
“मी माझ्या क्रिकेट करिअरमधील हे पर्व संपवत आहे. मी माझ्यासोबत असंख्या आठवणी आणि कृतज्ञता घेऊन जात आहे. तुमच्या प्रेमासाठी आणि पाठिंब्यासाठी आभार! जय हिंद,” असा कॅप्शनसहीत त्याने व्हिडीओ पोस्ट केला आहे. शिखर धवने 1 मिनिट 17 सेकंदांचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये त्याने, “नमस्कार सर्वांना, आज मी एका अशा वळणावर उभा आहे जिथून मागे पाहिल्यास केवळ आठवणी दिसतात आणि पुढे पाहिल्यास संपूर्ण आयुष्य आहे. भारतीय संघासाठी खेळण्याचं माझं स्वप्न होतं. ते स्वप्न पूर् णझालं. मी यासाठी अनेकांचे आभार मानू इच्छितो. सर्वात आधी माझे कुटुंबीय, लहानपणीचे माझे प्रशिक्षक तारक सिन्हाजी, मदन शर्माजी यांचा मी आभारी आहे. मी यांच्या प्रशिक्षणाअंतर्गच क्रिकेट शिकलो,” असं शेखर म्हणाला.
As I close this chapter of my cricketing journey, I carry with me countless memories and gratitude. Thank you for the love and support! Jai Hind! 🇮🇳 pic.twitter.com/QKxRH55Lgx
— Shikhar Dhawan (@SDhawan25) August 24, 2024
चाहत्यांचाही केला उल्लेख
भारतीय संघातून खेळतानाचे अनुभवही शिखर धवनने या व्हिडीओत सांगितले आहेत. “टीम इंडियातून खेळताना मला चाहत्यांचं भरपूर प्रेम मिळालं. मात्र आता या कथेत पुढे जाण्यासाठी पानं उलटावी लागणार आहेत. मी तेच करत आहे,” असं शिखरने चाहत्यांना सांगितलं आहे.
करिअर कसं?
धवन भारतीय संघाकडून 34 कसोटी सामने खेळला असून त्यात त्याने 2315 धावा केल्या आहेत. ज्यात सर्वोत्तम धावसंख्या 190 इतकी आहे. यात 7 शतकं आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये धवनने 167 सामने भारताकडून खेळले असून त्यात 6793 धावा केल्या आहेत. यामध्ये 17 शतकं आणि 39 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे धवनने 68 टी-20 सामन्यांमध्ये भारताकडून खेळताना 1759 धावा केल्या आङेत. यामध्ये 11 अर्धशकतांचा समावेश आहे. धवन हा एक उत्तम डावखुऱ्या सलामीवीरांपैकी एक होता.