महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – पिंपरी चिंचवड – ता. १८ – पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनानं थैमान घातलं आहे. रुग्ण वाढीचे कारण कोरोनाचा फैलाव नाही आहे तर मोठ्या संशयित व्यक्तींच्या चाचणीच्या संख्येत वाढ केल्याने हा आकडा दिवसेंदिवस फुगत आहे, असं आयुक्तांनी स्पस्ट केलं आहे. याशिवाय सध्या उपचार घेत असलेल्या सुमारे दहा हजार रुग्णांपैकी 85 टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षण नसून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचंही आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितलं आहे.
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनाची परिस्थिती कशी आटोक्यात आणायची हा मोठा प्रश्न प्रशासनासमोर ‘आ’ वासून उभा आहे. त्यात पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी धक्कादायक अंदाज वर्तवला आहे. जुलैअखेर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या तब्बल 24 हजार असेल, असं आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी म्हटलं आहे.
दुसरीकडे, पुण्यात चक्क मुंबईचे महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी पुण्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना कोरोना नियंत्रणाचे धडे दिल्याचं बघायला मिळालं. धारावी सारख्या भागात कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणणे, हे अत्यंत जिकरीचे काम होते. पण, प्रशासनाने पूर्ण हिंमतीने लढा देऊन धारावीला कोरोनातून बाहेर काढले आहे. आता पुण्याला कोरोनातून मुक्त करण्यासाठी मुंबईच्या अधिकाऱ्याने सांगितलेला पॅटर्न वापरावा, असा आदेश खुद्द पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्यासोबत पुण्यातील सर्व अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीला सर्व ज्येष्ठ, कनिष्ठ अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. चहल यांनी पदभार स्वीकारल्यानंतर धारावीमध्ये कोरोना नियंत्रण आणण्यासाठी महत्त्वाचे काम केले. त्यामुळे आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीतून कोरोना हद्दपार झाला आहे.