म्हाडा घरांची लॉटरी सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस?; घराचे स्वप्न पाहणाऱ्यांना उत्सुकता

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३० ऑगस्ट ।। म्हाडाने लॉटरीमधील घरांच्या किमती १० ते २५ टक्क्यांनी कमी करत अर्ज करण्यासाठीची मुदत १९ सप्टेंबरपर्यंत वाढविली असतानाच दुसरीकडे लॉटरी काढण्यासाठीची तयारीही सुरू केली आहे. त्यानुसार, म्हाडाच्या घरांची लॉटरी सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात काढली जाईल. नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये लॉटरी काढण्याचा कार्यक्रम होण्याची शक्यता आहे.

म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे २ हजार ३० घरांच्या विक्रीची प्रक्रिया सुरू आहे. पुनर्विकास प्रकल्पातून म्हाडाला बिल्डरकडून मिळालेल्या म्हाडाच्या हिश्श्यातील गृहसाठ्यापैकी ३७० घरांच्या विक्री किमती १० ते २५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आल्या आहेत. सुधारित किमती मुंबई मंडळाद्वारे लवकरच म्हाडाच्या वेबसाइटवरून जाहीर करण्यात येणार आहेत. घराकरिता अर्ज करण्यासाठी https://housing.mhada.gov.in या वेबसाइटचा आणि ॲपचाच वापर करावा.

हे लक्षात घ्या
– नोंदणी करताना इच्छुक अर्जदाराचा मोबाइल नंबर आधारशी लिंक असणे गरजेचे आहे.
– नोंदणी करतेवेळी अर्जदाराला डीजी लॉकर या ॲपमध्ये स्वतःसह पती/पत्नीचे आधार आणि पॅन कार्ड अपलोड करून ते लिंक करणे आवश्यक आहे.
– अर्जदाराने १ जानेवारी २०१८ रोजीनंतर जारी केलेले आणि बार कोड असलेले डोमिसाइल अपलोड करणे आवश्यक आहे.

आवाससाठी म्हाडाकडून नोंदणी
प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत उपलब्ध घरांसाठी अर्ज करण्याकरिता योजनेच्या पोर्टलवर नोंदणी करणे गरजेचे आहे. नोंदणी नसल्यास विजेत्या अर्जदारास सोडत पश्चात नोंदणी म्हाडा करून देणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न सहा लाख रुपयांहून कमी असावे. पती-पत्नी यांच्या नावे देशात कुठेही पक्के घर नसावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *