महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – मुंबई – ता. १९ – : कोरोना व लॉकडाऊनमुळे क्रीडा स्पर्धांवर संकट कोसळले आहे. काही स्पर्धा प्रेक्षकांविना सुरू करण्यात आल्या आहेत. बीसीसीआयनेही आगामी मोसमासाठी कंबर कसली असून शुक्रवारी झालेल्या बैठकीत या संदर्भात काही बाबींवर दृष्टीक्षेप टाकण्यात आला. आयपीएल व हिंदुस्थानी खेळाडूंचे सराव शिबीर युएईत आयोजित करण्याची योजना बीसीसीआय आखत आहे. मात्र यासाठी त्यांना आयसीसीच्या निर्णयाची वाट बघावी लागत आहे. टी-20 वर्ल्ड कपबाबत येत्या सोमवारी निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यानंतर बीसीसीआय आयपीएलबाबत पाऊल उचलणार आहे. अशी माहिती बीसीसीआय पदाधिकाऱयांकडून यावेळी देण्यात आली.
अहमदाबाद, धर्मशाळाही पर्याय
हिंदुस्थानी संघाचे सराव शिबीर कुठे आयोजित करायचे याबाबतही या बैठकीत विचारमंथन झाले. दुबईसह अहमदाबाद व धर्मशाळा या पर्यायांचाही यावेळी विचार करण्यात आला. पण हिंदुस्थानात कोरोना वाढत असल्यामुळे युएईतच टीम इंडियाच्या खेळाडूंच्या सराव शिबीराचे आयोजन करण्यात येण्याची दाट शक्यता आहे, असे पदाधिकाऱयांकडून व्यक्त करण्यात आले.