महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ सप्टेंबर ।। अहमदनगर येथे काल महंत रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला होता. यामध्ये भाजप आमदार नितेश राणेदेखील सहभागी झाले होते. सतत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या राणे यांनी या मोर्चातही मुस्लिम धर्मियांबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. यानंतर अहमदनगर पोलिसांनी रविवारी रात्री राणे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
महंत रामगिरी महाराज आणि बांग्लादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याच्याविरोधात हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना राणे यांनी अनेक वादग्रस्त विधाने केली होती.
काय म्हणाले होते राणे?
काही दिवसांपूर्वी रामगिरी महाराजांच्या प्रवचणातील एका मुद्द्यामुळे नाशिकमध्ये हिंसाचार उसळला होता. त्यावेळी रामगिरी महाराजांनी मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले होते.
दरम्यान नितेश राणे यांनी काल नगरमधील मोर्च्यावेळी, “रामगिरी महाराजांनी सिन्नरमधील प्रवचणात जो मुद्दा मांडला तो सतत मांडत रहावा, संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी आहे. जर कोणी मस्ती केली तर चून-चून के मारेंगे,” असे म्हटले होते.
मालवणी, मानखुर्द, घाटकोपर येथे कथित द्वेषपूर्ण भाषणे केल्याप्रकरणी भाजप आमदार नितीश राणे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांनी एप्रिल 2024 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाला दिली होती.
यापूर्वी राणे यांनी, माझा बॉस सागर बंगल्यावर आहे म्हणत पोलिसांनाही धमकी दिली होती. तसेच सांगलीत आयोजीत केलेल्या एका मोर्च्यात, “हे सरकार हिंदूंचे असून देवेंद्र फडणवीस त्याचे गृहमंत्री आहेत. जर पोलिसांनी मस्ती केली तर त्यांना अशा ठिकाणी पाठवू जिथून बायकोला फोनही लागणार नाही,” असे वक्तव्य केले होते.