या सुविधासह ‘वंदे भारत’ स्लिपर लवकरच रुळावर, कधी सुरु होणार? भाडे किती?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३ सप्टेंबर ।। स्लिपर वंदेभारत लवकरच रुळावर धावणार आहे. बस, रेल्वे किंवा विमान यापैकी वाहतुकीच्या कुठल्याही साधनात प्रवाशांना स्नानाची व्यवस्था नसते, मात्र या गाडीत एसी फ्सर्ट क्लासमध्ये गरम पाण्याच्या शॉवरची सोय करण्यात आली आहे. रात्रभर प्रवास केल्यानंतर सकाळी प्रवाशी आंघोळ करूनच गाडीतून उतरू शकतील.

जास्तीत जास्त १६० किमी प्रति तास वेगाने धावणाऱ्या वंदेभारत स्लिपरचे कोच बेंगळुरु येथील फॅक्टरीत तयार झाले आहेत. यात टक्कर प्रतिबंध प्रणाली असल्याने दोन गाड्यांची टक्कर होऊन अपघाताची भीती नाही. दिव्यांग प्रवाशांसाठी विशिष्ट पद्धतीचे बर्थ तसेच शौचालय तयार करण्यात आले आहेत. शौचालयात दुर्गंधी येणार नाही, अशी प्रणाली बसविण्यात आली आहे. सामान ठेवण्यासाठी मोठा कक्ष तयार करण्यात आला असल्याने प्रवाशांना सर्व सामान स्वत:जवळ घेऊन बसण्याची गरज राहणार नाही.याशिवाय लोकोपायलटसाठी लोकोकॅबमध्येच शौचालयाची व्यवस्था आहे.

नागपूर-पुणे मार्गावर धावणार?

वंदेभारत स्लिपर कोणत्या मार्गावर धावणार हे अद्याप जाहीर झालेले नाही. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने काही महिन्यांपूर्वीच नागपूर-पुणे-नागपूर मार्गावर ही गाडी सोडण्यात यावी, असा प्रस्ताव मध्य रेल्वे मुख्यालयाकडे पाठविला आहे. त्या प्रस्तावाचा विचार झाला तर या मार्गावर ही गाडी धावताना दिसू शकेल. मीडिया रिपोर्टनुसार या वंदे भारत स्लीपर ट्रेनचे तिकीट दर सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल असे ठरवले जाणार आहे.

कोचेस व बर्थ (प्रत्येक गाडीमध्ये)
एसी थ्री टायर : ११ कोच, ६११ बर्थ
एसी टू टायर : ४ कोच, १८८ बर्थ
एसी फर्स्ट : १ कोच, २४ बर्थ

आणखी तीन ‘वंदे भारत’ना हिरवा कंदील
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी मेरठ ते लखनऊ, मदुराई ते बेंगळुरू आणि चेन्नई ते नागरकोइल या तीन नवीन वंदे भारत रेल्वेगाड्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवला. या नव्या गाड्यांमुळे उत्तर प्रदेश, तमिळनाडू आणि कर्नाटकमध्ये दळणवळण अधिक गतिमान होण्याची आशा व्यक्त होत आहे. ‘२०४७पर्यंत भारताला विकसित करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी दक्षिणेकडील राज्यांचा जलद विकास महत्त्वाचा आहे. तमिळनाडू आणि कर्नाटकसाठी अर्थसंकल्पीय तरतूद वाढल्याने दक्षिणेकडील राज्यांमध्ये रेल्वे वाहतूक बळकट झाली आहे. रेल्वेसाठी यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात अडीच लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त तरतूद करण्यात आली आहे.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव काय म्हणाले?
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रविवारी येथील ‘बीईएमएल’ कारखान्यात वंदे भारत एक्स्प्रेसच्या स्लीपर कोच नमुन्याचे अनावरण केले. हे कोच सेवेत आणण्यापूर्वी १० दिवस त्यांची बारकाईने चाचणी केली जाईल. असे कोच असलेली गाडी पुढील तीन महिन्यांत सुरू होण्याची शक्यता असल्याचे वैष्णव यांनी पत्रकारांना सांगितले. या कोचच्या नमुन्यांची योग्य चाचणी झाल्यानंतरची त्यांच्या पुढील निर्मितीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. आणखी एक-दीड वर्षांनी वंदे भारत स्लीपर कोचची निर्मिती मोठ्या प्रमाणात सुरू होईल व त्यानंतर दर महिन्यात दोन ते तीन वंदे भारत स्लीपर सेवेत दाखल होतील, असेही वैष्णव यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *