महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३ सप्टेंबर ।। पुणे शहरातील अनेक मेर्टो स्थानकांच्या नावाला आक्षेप घेण्यात आला आहे. शहरातील काही मेट्रो स्थानकांची नावे बदलण्याची मागणी केल्या अनेक दिवसांपासून होत आहे. याबाबत आता एक महत्वाची बातमी समोर आली असून पुणे शहरातील तीन स्थानकांची नावे बदलण्यात येणार आहेत. पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी याबाबतची माहिती दिली आहे. कोणत्या स्थानकांची नावे बदलणार आहेत? जाणून घ्या सविस्तर…
पुण्यातील मेट्रो स्थानकांची नावे बदलणार..
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुणे शहरातील तीन मेट्रो स्थानकांची नावे बदलणार असल्याची महत्वाची बातमी समोर आली आहे. ही नामांतराची प्रक्रिया पूर्ण झाली असून याबाबतचे गॅझेटही लवकरच प्रसिद्ध होणार आहे. शहरातील बुधवार पेठ, मंगळवार पेठ आणि नाशिक फाटा या तीन स्थानकांची नावे बदलण्यात येणार आहेत.
जाणून घ्या नवी नावे..
या नामांतरानंतर बुधवार पेठ स्थानकाचे नाव कसबा पेठ स्थानक, मंगळवार पेठ स्थानकाचे नाव आरटीओ स्थानक आणि नाशिक फाटा स्थानकाचे नाव कासारवाडी असे करण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. तसेच सिव्हिल कोर्ट स्थानकाचे नाव शिवाजीनगर जिल्हा न्यायालय करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे.
काय म्हणाले मुरलीधर मोहोळ?
पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज स्वारगेट मेट्रो स्टेशनची पाहणी केली. स्वारगेट मेट्रो स्टेशन हे भूमिगत असून मल्टी मॉडेल हब म्हणून ओळखलं गेलं आहे. अत्यंत अत्याधुनिक आणि अद्यावत पध्दतीने हे मेट्रो स्टेशन लवकरच प्रवशांसाठी खुलं करण्यात येईल तसेच स्वारगेट ते कात्रज या मार्गाचे देखील भूमिपूजन सोहळा पार पडेल असा विश्वास केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी वर्तवला.
तसेच पुणे मेट्रोसाठी २ मार्ग आहेत. एक मार्ग पूर्ण झाला आहे, वनाज ते रामवाडी १५ किमी अंतर पूर्ण झालं आहे. पी सी एम सी ते स्वारगेट याचं काम ९० टक्के पूर्ण झालं आहे. शिवाजीनगर, सिव्हील कोर्ट, स्वारगेट. यांच्या तांत्रिक परवानगी झाल्यावर काहीच दिवसात हे स्टेशन सुरू होईल. कसबा पेठ, मंडई या स्टेशन ची कामं पूर्ण झाली आहेत, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.