Maharashtra Assembly Election 2024: नोव्हेंबरमध्ये राज्यात निवडणुका ? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले सूतोवाच!

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ सप्टेंबर ।। महाराष्ट्र विधानसभा निवडणुका नेमक्या कधी होणार? याविषयी अद्याप निवडणूक आयोगाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. जम्मू-काश्मीर व हरियाणा विधानसभा निवडणुकांची घोषणा करताना महाराष्ट्रातील निवडणुकांबाबत नंतर घोषणा केली जाईल, असा उल्लेख निवडणूक आयोगानं केला. मात्र, याबाबत अद्याप निवडणूक आयोगानं कोणतीही ठोस घोषणा केलेली नाही. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी निवडणुका नोव्हेंबर महिन्यात होणार असल्याचं मोठं विधान केलं आहे. त्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगानं गेल्या महिन्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत जम्मू-काश्मीर व हरियाणा या राज्यांमधील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. त्यानुसार, १८ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यांमध्ये निवडणुका आणि त्यांचे निकाल लागणार आहेत. त्याचवेळी हरियाणामध्ये एकाच टप्प्यात राज्यभरातील मतदारसंघामध्ये मतदान होऊन त्यांचेही निकाल जम्मू-काश्मीरबरोबरच लावले जातील. आधी १ ऑक्टोबर रोजी हरियाणात मतदानाची तारीख जाहीर केली होती. मात्र, नंतर त्यात बदल करून ती ५ ऑक्टोबर करण्यात आली आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान
दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील निवडणुकांची घोषणा करताना महाराष्ट्रातील निवडणुकांच्या तारखांबाबत निवडणूक आयोगानं कोणतीही ठोस माहिती दिली नव्हती. आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर या राज्यांमधील निवडणुका पुढे ढकलल्याचाही उल्लेख आयोगानं केला. मात्र, आता खुद्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच राज्य विधानसभा निवडणुकांबाबत मोठं विधान केलं आहे. दिलीप लांडेंबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी आगामी निवडणुकांमध्ये विजयी करण्याचं आवाहन उपस्थितांना केलं. तेव्हा त्यांनी निवडणुकांच्या तारखांचा संदर्भ दिला. “आता दोन महिन्यांत निवडणुका आहेत ना? नोव्हेंबरमध्ये. तेव्हा आपण सगळ्यांनी प्रचंड मताधिक्याने दिलीप लांडेंच्या मागे उभं राहायचं”, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.

“यंदा आम्ही रेकॉर्डब्रेक मताधिक्याने जिंकून येऊ. समोरच्याचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही. विरोधातले सगळे लोक बिथरलेत. टीव्हीवर बघितलं ना जोडेमारो आंदोलन. कार्यकर्त्यांनी जोडे मारलेले मी समजू शकतो. पण मुख्यमंत्रीपदी राहिलेली मोठमोठी माणसं हातात जोडे घेऊन मारतायत. काय परिस्थिती आहे ही? दुसऱ्याचे जोडे हातात घ्यायला थोडं तरी काही वाटलं पाहिजे. आज बाळासाहेबांना हे सगळं बघून किती वाईट वाटलं असेल”, अशी टीकाही त्यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *