ST Bus Strike : प्रवाशांचे हाल, एसटी कर्मचारी दुसऱ्या दिवशीही संपावर ठाम

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ सप्टेंबर ।। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज सलग दुसरा दिवस आहे. रस्त्यावरून एकही महामंडळाची बस धावताना दिसत नाहीये. त्यामुळे विद्यार्थी, प्रवासी यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहे. सध्या सणासुदीचे दिवस असल्याने आणि आगामी काळात गणेश उत्सव, गौरी गणपती असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याचं दिसत आहे. काल ११ कामगार संघटनांच्या कृती समितीने पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील एसटीच्या २५१ पैकी ६३ आगार पुर्णतः बंद होते. तर ७३ आगारांमध्ये अंशतः वाहतूक सुरू होती. तर ११५ आगारामध्ये पुर्णतः वाहतूक सुरळीत सुरू होती.

एसटी कर्मचारी संपावर ठाम
राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संपाचा परिणाम आता बुलढाणा जिल्ह्यात काही प्रमाणात जाणवायला लागलाय. बुलढाणा जिल्ह्यातील सातही आगारातील कर्मचारी निम्याहून अधिक कर्मचारी संपावर असल्याने (Maharashtra ST Employees Workers strike) आज सकाळपासून राज्य परिवहन मंडळाच्या काही बस रस्त्यावर धावत आहेत, तर अनेक बसेस रद्द झाल्या आहेत. त्यामुळे नोकरदार, शालेय विद्यार्थी, वृद्ध प्रवासी यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याचे चित्र सध्या बुलढाणा जिल्ह्यात आहे.

महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संपाचा परिणाम
पुण्यात स्वारगेट बस स्थानकातून काही गाड्यांची ये-जा सुरू आहे, तर काही बस बंद आहेत. ६० टक्के सुरू आहेत, तर ४० टक्के बंद आहेत. आज राष्ट्रपतींच्या दौऱ्याला एसटी कर्मचाऱ्यांच्या (ST Bus Strike ) संपाचा फटका बसत असल्याचं दिसतंय. यामुळे काही खासगी बसचं नियोजन करण्यात आलंय. राष्ट्रपती यांच्या लातूर येथील कार्यक्रमासाठी विविध शासकीय योजनेतील पात्र महिलांना उदगीर या ठिकाणी जाण्यासाठी जवळपास सहाशे बसचं नियोजन करण्यात आलं होतं.

राज्य परिवहन महामंडळ कामगारांच्या प्रलंबित विषयांबाबत सह्याद्रीवर होणाऱ्या बैठकीसाठी सर्वच एसटी कर्मचारी संघटनांना निमंत्रण देण्यात आलंय. एसटी कृती समितीतील कर्मचारी संघटनांसोबतच आमदार गोपीचंद पडळकर यांच्या संघटनेला देखील निमंत्रण दिलं गेलं होतं. सोबतच ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या संघटनेसोबत देखील राज्य सरकार चर्चा करणार (ST Employees Stike) आहे. एकूण २७ एसटी कर्मचारी संघटनांना सह्याद्रीवरील बैठकीसाठी निमंत्रण दिलं गेलंय. संपात सहभागी नसलेल्या संघटनांना देखील निमंत्रण दिल्याची माहिती मिळतेय.

रस्त्यावर लाल परी दिसेना
एसटी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या संपाचा परिणाम छत्रपती संभाजी नगरमध्ये सुद्धा पाहायला मिळत आहे. आगारातून एकही बस धावली नसून काल दिवसभरात जवळपास १५२७ बस फेऱ्या रद्द झालेल्या (ST Bus) आहेत, यामुळे एसटी महामंडळाचे जवळपास ४६ लाख ५७ हजार ८६४ रूपयाचं नुकसान झालंय. जिल्ह्यातून विविध मार्गावर ५२८ बस सेवा देतात, मात्र ६ आगारातून एकही बस बाहेर पडली नाही. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहे. आज सकाळपासून एकही बस बस स्थानकात दाखल झाली नसल्याने तासंतास ताटकळत उभे राहून काही प्रवाशांना माघारी फिरावे लागत आहे. दरम्यान मराठवाड्यासह विदर्भात जाणाऱ्या एकही बस बसस्थानकात दाखल झाली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *