Vanraj Andekar Murder: तुला आज पोरं बोलावून ठोकतेच; आंदेकरांच्या हत्येचा हेतू काय?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ सप्टेंबर ।। राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खूनप्रकरणी त्यांची बहीण संजीवनी कोमकर, तिचा दीर प्रकाश कोमकर आणि कथित मुख्य सूत्रधार सोमनाथ गायकवाड यांना न्यायालयाने नऊ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमृत बिराजदार यांनी हा आदेश दिला. त्यानुसार, पोलिस आरोपींची कोठडीत चौकशी करून वनराज आंदेकरच्या खुनामागचा नेमका हेतू तपासणार आहेत.


वनराज आंदेकर यांचा रविवारी रात्री नाना पेठेत पिस्तुलातून गोळ्या झाडून; तसेच कोयत्याने वार करून खून करण्यात आला. त्यांचे वडील बंडू उर्फ सूर्यकांत राणोजी आंदेकर (वय ६८, रा. नाना पेठ) यांनी समर्थ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आतापर्यंत आंदेकरांचे जावई जयंत लक्ष्मण कोमकर (वय ५२) व गणेश लक्ष्मण कोमकर (वय ३७) यांच्यासह त्यांची मुलगी संजीवनी जयंत कोमकर (वय ४४), प्रकाश लक्ष्मण कोमकर (वय ५१, सर्व रा. नाना पेठ) आणि सोमनाथ सयाजी गायकवाड (वय ४१, मूळ रा. नाना पेठ, सध्या रा. आंबेगाव पठार, धनकवडी) यांना अटक केली आहे. अन्य आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. त्यापैकी जयंत व गणेशला न्यायालयाने नऊ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यानंतर पोलिसांनी संजीवनी, प्रकाश व सोमनाथ यांना अटक करून न्यायालयात हजर केले.

सर्व आरोपींनी नियोजित कट रचून आणि चिथावणी देऊन हा गुन्हा केला आहे. आरोपी सोमनाथ सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर शहरात; तसेच हवेली व नाशिक रोड पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्यांना पोलिस कोठडी देण्याची मागणी तपास अधिकारी आणि सरकारी वकील निलिमा इथापे-यादव यांनी केली.

आरोपींतर्फे अॅड. पुष्कर पाटील, अॅड. ऋतुराज पासलकर व अॅड. आर. आर. पाटील यांनी बाजू मांडताना आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी केली. दोन्ही बाजू ऐकून घेऊन न्यायालयाने आरोपींना सात दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

सोमनाथ गायकवाड मुख्य सूत्रधार?
वनराज आंदेकरच्या खुनामागचा मुख्य सूत्रधार सोमनाथ गायकवाड असल्याचा पोलिसांना संशय आहे. कौटुंबिक, संपत्ती व वर्चस्ववादातून हा खून झाल्याचा कयास व्यक्त केला जात असून, त्या दृष्टीने पोलिस तपास करीत आहेत. आतापर्यंत प्राथमिक तपासात वनराज यांची बहीण संजीवनी, तिचा पती जयंत, दीर गणेश व प्रकाश यांचे आंदेकरांसोबत वाद झाले होते. आंदेकरांच्या सांगण्यावरून कोमकर यांच्या दुकानावर अतिक्रमण कारवाई झाल्याचा राग आरोपींना होता. या प्रकरणी संजीवनी यांनी वनराज आंदेकरांना ‘तुला जगू देणार नाही, तू आमचे दुकान पाडण्यास सांगून आमच्या पोटावर पाय देतोस, तुला आज पोरं बोलावून ठोकतेच,’ अशी धमकी दिली होती. त्यानंतर आरोपींनी खुनाचा कट रचला. त्यासाठी आंदेकर टोळीतून फुटलेल्या सोमनाथ गायकवाडची मदत घेतल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *