महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ सप्टेंबर ।। कागल विधानसभेत राजकीय रणशिंग फुंकले गेले आहे आणि या वेळी शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) आणि अजित पवार गट यांच्यातील संघर्ष उफाळून आला आहे. शरद पवारांनी भाजपचे नेते समरजीत घाटगे यांना आपल्या पक्षात सामील करून घेतले आहे, ज्यामुळे कागल विधानसभा निवडणुकीत हसन मुश्रीफ विरुद्ध समरजीत घाटगे असा सामना ठरला आहे.
शरद पवारांचा हल्लाबोल
शरद पवार यांनी कोल्हापूरमधील एका सभेत समरजीत घाटगे यांचा पक्षप्रवेश करून घेताना कागलच्या जनतेसमोर आपल्या विचारांची मांडणी केली. त्यांनी या सभेत बोलताना हसन मुश्रीफ यांच्यावर तीव्र टीका केली. पवारांनी सांगितले की, “आम्ही या तालुक्याच्या एका व्यक्तीला सर्व काही दिले, पण संकट आल्यानंतर तो एनडीएच्या मागे लागला. ईडीच्या चौकशीनंतर त्यांनी साथ सोडली, आता त्यांना आपली जागा दाखवायला हवी.”
हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रीया-
शरद पवारांच्या या टीकेनंतर हसन मुश्रीफ यांनी देखील आपल्या विधानांद्वारे शरद पवारांच्या आव्हानाला उत्तर दिले. मुश्रीफ म्हणाले, “लोकशाहीत कोणत्याही व्यक्तीचे वय २५ च्या वर झाले की तो निवडणूक लढू शकतो. आता सात पक्ष आहेत, त्यामुळे उमेदवारांची मांदियाळी झाली आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, “पवार साहेब माझे दैवत आहेत, पण ते माझ्या सारख्या अल्पसंख्यांकांच्या मागे का लागत आहेत हे मला कळत नाही.”
मुश्रीफ यांनी आपल्या वक्तव्यात स्पष्ट केले की, “निवडणुकीत शरद पवार आपसे बैर नही, समरजीत तेरी खैर नही.” त्यांनी अजूनही आपली भूमिका कायम ठेवली असून, या निवडणुकीत आपली लढाई नायक विरुद्ध खलनायक अशी आहे, असे ते म्हणाले.
संघर्षाची तयारी-
कागल विधानसभा क्षेत्रात आता समरजीत घाटगे विरुद्ध हसन मुश्रीफ असा संघर्ष होत आहे. पवार साहेबांनी केलेल्या आरोपांमुळे या लढतीची तीव्रता वाढली आहे. या संघर्षात कोणता नेता बाजी मारणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.