महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ सप्टेंबर ।। वाघोलीतील वाहतूक समस्येबाबत वरिष्ठ पोलीस अधिकारी, आमदार अशोक पवार, पी एम आर डी ए, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण व महापालिका अधिकारी यांनी संयुक्तपणे मंगळवारी सायंकाळी पाहणी केली.
बायपास रस्ता विकसित करणे, केसनंद फाटा चौकाचे स्थलांतर करणे, खाजगी ट्रॅव्हल्स बसेस रस्त्यावर थांबणार नाहीत यासाठी दक्षता घेणे आदी उपाययोजना बाबत चर्चा झाली. आमदार पवार, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, वाहतूक उपायुक्त अमोल झेंडे ,
पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड, लोणीकंद वाहतूक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक गजानन जाधव यांनी पाहणी केली. वाघेश्वर मंदिर चौकातून बायफरोड कडे उलटी वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते. त्यासाठी पदपथ काढून रस्ता विकसित कारने. केसनंद फाटा स्थलांतर करणे, महामार्गालगत पदपथ हटवून त्या जागी रस्ता करणे, वाघेश्वर मंदिर ते लोणीकंद येथील सुरभी चौक रस्ता विकसित कारने,
थेऊर हून लोणी कंद येथे येणाऱ्या चौकातील चढ कमी करणे आदी उपाययोजना करण्याबाबत चर्चा झाली. खाजगी ट्रॅव्हल्स बसेस, डंपर वाघोलीत रस्त्यावर दिसता कमा नये असे आदेश पाटील यांनी लोणीकंद वाहतूक विभागाला दिले.
खांदवे नगर ते लोणीकंद पर्यंत महामार्गाची पाहणी करण्यात आली. आमदार पवार यांनी पी एम आर डी ए, महापलिका व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून गरजेची कामे त्वरीत करून देण्याची मागणी केली.
पुणे नगर महामार्गावरून दररोज सुमारे दीड लाख वाहने ये जा करतात. बाय पास रस्ते नसल्याने नगर कडे जाण्यासाठी वाघोलीत यावेच लागते. यामुळे वाहतुकीचा ताण जास्त आहे. छोट्या मोठ्या उपाययोजना करून व बायपास रस्ते विकसित करून वाहतूक समस्या सोडवावी लागेल.
– मनोज पाटील, अतिरिक्त पोलीस आयुक्त.
नागरिकांची नाराजी
अशी पाहणी अनेक वेळा झाली. महापालिका, पी एम आर डी ए व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी फक्त पाहणीवेळी कामे करू एवढेच उत्तर देतात. ते काहीच कामे करतच नाही. अशी नाराजी यावेळी अनेकांनी बोलून दाखविली.