Heavy Rain Alert : राज्यात आज कुठे कुठे कोसळणार पाऊस? 13 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०६ सप्टेंबर ।। राज्यात पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला असून आज शुक्रवारी मुंबई आणि ठाण्यात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यातही विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुसरीकडे पुण्यासह संपूर्ण कोकणाला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार असल्याने पर्यटकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आलंय.

गेल्या आठवड्यात मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. सलग चार ते पाच दिवस पावसाच्या सरी बरसल्यामुळे धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा जमा झाला. त्यामुळे अनेक जिल्ह्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला. मात्र, दुसरीकडे मुसळधार पावसाने (Heavy Rain) झोडपल्याने खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले.

तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली पिके पावसामुळे आडवी झाल्याने शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले. सरकारने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी बळीराजाने केली. या पावसाचा फटका सहन करत असतानाच भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखीच वाढली आहे.

आज कुठे कुठे कोसळणार पाऊस?
भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, आज मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता (Rain Alert) आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड परभणी, लातूर, तसेच धाराशिव जिल्ह्याचा समावेश आहे. बीड जिल्ह्यातही हलक्या पावसाची शक्यता आहे.

दुसरीकडे विदर्भातील, अकोला, अमरावती, नागपूर, बुलढाणा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आलाय. मुंबईसह उपनगरातही आज शुक्रवारी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे आणि ठाण्यासह संपूर्ण कोकणाला आज पावसाचा अलर्ट देण्यात आलाय. नवी मुंबई आणि उर्वरित भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *