राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय, ‘उन्नत’साठी साडेसात हजार कोटींचा खर्च ; छत्रपती संभाजीनगर-पुणे सुसाट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०६ सप्टेंबर ।। पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा राष्ट्रीय महामार्ग भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (एनएचएआय) एप्रिलमध्ये राज्य पायाभूत विकास महामंडळाकडे (एमएसआयडी) हस्तांतर करण्यात आला आहे. त्यामुळे पुणे ते शिरूरपर्यंतचा ५६ किलोमीटर लांबीचा आणि साडेसात हजार कोटी रुपयांच्या खर्चाचा उन्नत महामार्ग (एलिव्हेटेड) ‘एमएसआयडी’कडून करण्यात येणार आहे. त्यानंतर शिरूर ते छत्रपती संभाजीनगर या दरम्यानच्या महामार्गाचा नव्याने विकास आराखडा (डीपीआर) करण्यात येणार आहे. त्याबाबत गुरुवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

या संदर्भातील पुणे ते छत्रपती संभाजीनगर महामार्गाच्या सुधारित मार्गाचा प्रस्ताव बांधकाम विभागाने मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यतेसाठी ठेवला होता. त्या प्रस्तावाला मान्यता देण्याचा निर्णय़ घेण्यात आला. त्यामुळे पुणे ते छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गाच्या सुधारणेचा मार्ग मोकळा झाला आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा महामार्ग पूर्वी ‘एनएचएआय’मार्फत करण्यात येणार होता. त्याला मान्यताही देण्यात आली होती. मात्र, एप्रिल दरम्यान हा महामार्ग ‘एनएचएआय’ आणि ‘एमएसआयडीसी’ यांच्यात झालेल्या करारानुसार ‘एमएसआयडीसी’कडे हस्तांतर करण्यात आला. त्यामुळे त्या प्रकल्पावर ‘एमएसआयडीसी’ मार्फत काम करण्यात येत आहे.

पूर्वीच्याच ‘डीपीआर’नुसार काम
पुणे (खराडी बायपास) ते शिरूरपर्यंत सुमारे ५६ किलोमीटर लांबीचा सहापदरी उन्नत महामार्ग करण्यात येणार आहे. याचा ‘डीपीआर’ पूर्वी ‘एनएचएआय’ मार्फत करण्यात आला होता. त्याच ‘डीपीआर’नुसार हा उन्नत महामार्ग करण्यात येणार आहे. या महामार्गासाठी सुमारे सात हजार ५१५ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या महामार्गात गरजेनुसार उड्डाणपूल आणि रस्त्यांचा समावेश असेल. त्यापुढे शिरूर ते छत्रपती संभाजीनगरपर्यंतच्या महामार्गाचा ‘डीपीआर’ ‘एमएसआयडीसी’कडून करण्यात येणार आहे. त्याचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे बांधकाम विभागातील उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.

दोन हजार ५० कोटींचा खर्च अपेक्षित
शिरूर-नगर बाह्यवळण रस्त्यामार्गे छत्रपती संभाजीनगर हा सध्याचा रस्ता सुधारण्यासाठी दोन हजार ५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. शिरूर ते नगर या मार्गामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पथकर वसुली होत आहे. त्यामुळे ही पथकर वसुली संपल्यानंतर हा मार्ग ‘एमएसआयडीसी’कडे हस्तांतर करण्यात येईल. नगर ते देवगड हा रस्ता सुधारण्यासाठी तो ‘एमएसआयडीसी’ला हस्तांतर करण्यात येईल; तसेच देवगड ते छत्रपती संभाजीनगर या मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पथकर वसुली होत आहे. ती संपुष्टात आल्यानंतर हा मार्ग ‘एमएसआयडीसी’ला हस्तांतर करण्यात येईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने काम पूर्ण करण्यात येईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *