महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०६ सप्टेंबर ।। राज्यातील मोठी धरणे २०१८ नंतर प्रथमच १०० टक्के भरली असल्याची माहिती जलसंपदा विभागाने गुरुवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत दिली. उजनी, कोयना, जायकवाडी त्याच प्रमाणे भातसा आणि वैतरणा ही धरणे १०० टक्क्यांच्या आसपास भरल्याची माहिती देण्यात आली. गेल्या वर्षी याच सुमारास सुमारे ६५ टक्के पाणी साठा या धरणांमध्ये होता.
राज्यात सरासरीच्या १२१ टक्के पाऊस झाला असून १०२ टक्के पेरण्या झाल्या आहेत, अशी माहिती कृषी विभागाने बैठकीत दिली. गेल्या वर्षी याच सुमारास सरासरीच्या ८१.४ टक्के पाऊस झाला होता. एक जून ते दोन सप्टेंबरपर्यंत १००२ मि.मी. पाऊस झाला आहे. राज्यात खरिपाचे १४२.०२ लाख हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी १४४.९२ लाख हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच १०२ टक्के पेरण्या झाल्या आहेत. केवळ पाच तालुक्यात ५० ते ७५ टक्के पाऊस झाला असून ३०५ तालुक्यात १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.
राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा
सध्याच्या पुणे-शिरूर-अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा करण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. पुणे ते शिरूर हा ५३ कि.मी. चा मार्ग सहा पदरी उन्नत करण्यात येणार असून ‘एमएसआयडीसी’मार्फत हे काम केले जाईल. यासाठी सात हजार ५१५ कोटी खर्च अपेक्षित आहे.
शिरूर -अहमदनगर
बाह्यवळण रस्ता मार्गे छत्रपती संभाजीनगर हा सध्याचा रस्ता सुधारण्यासाठी दोन हजार ५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. शिरूर ते अहमदनगर या मार्गामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पथकर वसुली होत आहे. त्यामुळे ही पथकर वसुली संपल्यानंतर हा मार्ग हस्तांतरित करण्यात येईल.
विहिरी, शेततळ्यांसाठी अनुदान
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष सुधारून विहिरी, शेततळे, वीज जोडणी आदींसाठी भरीव अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. सुधारित निर्णयानुसार नवीन सिंचन विहिरीस चार लाखांपर्यंत तर जुन्या विहिरींच्या दुरुस्तीस एक लाखांपर्यंत अनुदान देण्यात येईल. पूर्वी हे अनुदान अनुक्रमे अडीच लाख आणि पन्नास हजार एवढे होते.
अन्य निर्णय
अमरावती जिल्ह्यात नवीन मत्स्य विज्ञान महाविद्यालयासाठी जागा देणार
शेवगाव तालुक्यातील सहकारी सूतगिरणीस अर्थसाहाय्य
अंगणवाडी केंद्रांना सोलर सिस्टिम देणार ३६ हजारापेक्षा जास्त केंद्रे प्रकाशमान होणार
औद्योगिक कामगार न्यायालयातील न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित भत्ते
थकबाकी देणाऱ्या कुक्कुटपालन संस्थांना दंडव्याज माफ
धारूर तालुक्यातील सुकळी गावाचे खास बाब म्हणून पुनर्वसन करणार
पैठण, गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त न्यायालय हिंगोली स्वतंत्र न्यायिक जिल्हा
नागेश्वरी लघू पाटबंधारे योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यता