महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ७ सप्टेंबर ।। तगड्या कमाईच्या संधीची वाट पाहण्याऱ्यांसाठी लवकरच चांगले दिवस येण्याची शक्यता आहे. कारण सोनं या मौल्यवान धातूचा भाव आगामी काळात चांगलाच वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करून चांगली कमाई करण्याची संधी निर्माण होऊ शकते.
सोन्याचा भाव ‘या’ कारणामुळे वाढू शकते
रॉयटर्स या आंतरराष्ट्रीय वृत्तसंकेतस्थळाच्या एका रिपोर्टमध्ये रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीप्रमाणे गोल्डमॅन सॅशच्या अंदाजानुसार आगामी काळात सोन्याचा दर वाढण्याची शक्यता आहे. कठीण काळात सोन्याचा खूप उपयोग होता. गेल्या दोन वर्षांपासून सोन्याच्या दरात चांगलाची तेजी दिसली. याच कारणामुळे जगभरातील गुंतवणूकदारांनी सोन्यापासून दोन हात दूर राहणंच पसंद केलं होतं. मात्र आता पुन्हा एकदा हेच गुंतवणूकदार सोन्यात गुंतवणूक करू शकतात. अमेरिकेची मध्यवर्ती फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा जगभरातील गुंतवणूकदार सोन्यात गुंतवणूक करू शकतात.
2,700 डॉलरपर्यंत पोहोचण्याची शक्यता
गोल्डमॅन सॅशच्या अंदाजानुसार आगामी वर्षाच्या सुरुवातीला सोनं 2,700 डॉलरवर पोहोचू शकतं. सध्या जागतिक बाजारात सोन्याच्या दर एक टक्क्याने वाढला असून तो 2,507 डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचला आहे. म्हणजेच गोल्डमॅन सॅशचा अंदाज खरा ठरला तर आगामी पाच ते सहा महिन्यांत सोन्यााच दर साधारण 7-8 टक्क्यांनी वाढू शकतो.
78 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतो भाव
भारताच्या स्थानिक बाजारात शुक्रवारी एमसीएक्सवर सोनं 72 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या आसपास ट्रेड करत होतं. घरगुती बाजारातील भाव जागतिक बाजाराच्या हिशोबाने वाढला तर आगामी 5-6 महिन्यांत सोनं 7-8 टक्क्यांनी वाढू शकतं. म्हणजेच आगामी वर्षाच्या सुरुवातीला सोन्याचा दर 78 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतो.
या वर्षी 21 टक्क्यांनी सोनं महागलं
या वर्षी सोन्याच्या दरात ऐतिहासिक तेजी पाहायला मिळाली. परदेशी बाजारात सोनं या वर्षी तब्बल 21 टक्क्यांनी महागलं. गेल्या महिन्यात सोन्याच्या दराने सर्वोच्च शिखर गाठलं होतं. विदेशी बाजारात 20 ऑगस्ट रोजी सोन्याचा दर 2,531.60 डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचला होता.
देशांतर्गत बाजारात16 टक्क्यांची तेजी
देशांतर्गत बाजारातही या वर्षी सोनं चांगलंच चकाकलं आहे. या वर्षाच्या सुरुवातीला एमसीएक्सवर सोनं 62 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या आसपास होतं. सध्या सोन्याचा भाव 72 हजार रुपयांच्या आसपास आहे. म्हणजेच या वर्षी आतापर्यंत सोन्यांचा दर 16 टक्क्यांनी वाढला आहे.