महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०९ सप्टेंबर ।। इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना केनिंग्टन ओव्हल, लंडन येथे खेळला गेला. मालिकेत ०-२ ने पिछाडीवर पडल्यानंतर श्रीलंकेने या सामन्यात दमदार कामगिरी करत विजयासह दौऱ्याचा समारोप केला. श्रीलंकेने हा सामना चार दिवसांत जिंकला. इंग्लंडने ही मालिका २-१ ने जिंकली असली तरी त्यांचा हा पराभव ऐतिहासिक ठरला. गेल्या १० वर्षात श्रीलंकेच्या संघाने इंग्लंडविरूद्ध पहिल्यांदा कसोटी सामन्यात विजय मिळवला. पाथूम निसांकाच्या शतकाच्या जोरावर श्रीलंकेने नवा पराक्रम केला.
सामन्याच्या पहिल्या दोन दिवसात इंग्लंडचा संघ वरचढ दिसत होता. पण तिसऱ्या दिवसापासून सारा खेळच बदलून गेला. श्रीलंका संघाच्या गोलंदाजांनी तिसऱ्या दिवसाच्या खेळात चमकदार कामगिरी करत इंग्लंडच्या संघाला दुसऱ्या डावात अवघ्या १५६ धावांवर रोखले. येथून श्रीलंकेचा संघ सामन्यात पुनरागमन करण्यात यशस्वी ठरला. त्यांना सामन्याच्या चौथ्या डावात विजयासाठी २१९ धावांचे लक्ष्य मिळाले. श्रीलंकेने अवघे २ गडी गमावून हे आव्हान पार केले. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंड संघाने ३२५ धावा केल्या होत्या. याला प्रत्युत्तर देताना श्रीलंकेचा संघ पहिल्या डावात केवळ २६३ धावा करू शकला. अशा स्थितीत इंग्लंडला पहिल्या डावानंतर ६२ धावांची आघाडी मिळाली. मात्र दुसऱ्या डावात संघाची कामगिरी अत्यंत खराब झाली. दुसऱ्या डावात ना फलंदाज धावा करू शकले ना गोलंदाज काही प्रभाव दाखवू शकले. त्यामुळे या सामन्यात इंग्लंडला पराभवाचा सामना करावा लागला.
पाथूम निसांकाची झंझावाती खेळी
या सामन्यात पाथूम निसांका श्रीलंकेच्या विजयाचा हिरो ठरला. सामन्याच्या शेवटच्या डावात त्याने अप्रतिम कामगिरी केली. त्याने १२४ चेंडूत नाबाद १२७ धावा करत संघाला विजय मिळवून दिला. त्याच्या खेळीत १३ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. दुसरीकडे, अँजेलो मॅथ्यूजने ६१ चेंडूत नाबाद ३२ धावा करत निसांकाला साथ दिली. मागच्या सामन्याच्या शेवटच्या डावातही निसांकाने अर्धशतक झळकावले होते. त्याने ५१ चेंडूत ६४ धावांची जलद खेळी खेळली होती.
इंग्लंडविरूद्ध ‘येथे’ श्रीलंका अजिंक्य
श्रीलंकेने आतापर्यंत केनिंग्टन ओव्हल, लंडन येथे २ कसोटी सामने खेळले आहेत. हे दोन्ही सामने जिंकण्यात श्रीलंका यशस्वी ठरली आहे. याचाच अर्थ लंडनच्या केनिंग्टन ओव्हल स्टेडियमवर कसोटी क्रिकेटच्या इतिहासात इंग्लंडचा संघ श्रीलंकेला अद्याप पराभूत करू शकलेला नाही.