महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०९ सप्टेंबर ।। आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार युगेंद्र पवार यांनी बारामती तालुक्यामध्ये स्वाभिमान यात्रा आयोजित केली आहे. मंगळवार (ता. 10) पासून ही यात्रा सुरु होणार आहे.बारामती तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये जाऊन लोकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी या स्वाभिमान यात्रेच्या निमित्ताने समजून घेणार असल्याचे युगेंद्र पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
ते म्हणाले, ज्येष्ठ नेते शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या आशिर्वादाने ही यात्रा बारामतीत करणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचा विचार विधानसभा मतदारसंघात सर्वदूर पोहोचविण्याचा प्रयत्न या माध्यमातून करेन. महाराष्ट्राचा स्वाभिमान कधी दिल्लीपुढे झुकला नाही व या पुढील काळात झुकणार नाही हाही विचार लोकांपर्यंत नेणार आहे.
या पूर्वीही युगेंद्र पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या विजयानंतर बारामती तालुक्यात आभार दौरा केलेला होता. आगामी विधानसभा निवडणूकीमध्ये युगेंद्र पवार हेच तुतारीचे उमेदवार असतील हे आता जवळपास निश्चित झाले आहे. त्यांनी या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भेटीगाठी व दौरे वाढविले आहेत. अद्याप अधिकृतपणे त्यांच्या उमेदवारीबाबत निर्णय झालेला नसला तरी त्यांची जी तयारी सुरु आहे त्या वरुन तेच उमेदवार असतील असा कयास आहे.