Nagpur Hit and Run : …तर संकेत बावनकुळे हिट अँड रन प्रकरणात सहआरोपी, पोलिसांच्या नव्या भूमिकेमुळे मोठा ट्विस्ट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ सप्टेंबर ।। नागपुरातील ऑडी कार हिट अँड रन प्रकरणावरुन उफाळलेल्या राजकीय वादळानंतर पोलीस भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळेंना सहआरोपी करण्याची शक्यता आहे. संकेत यांचे मित्र अर्जुन हावरे आणि रोनित चिंतमवार यांच्या रक्ताच्या नमुन्यांमधील अल्कोहोलबाबत फॉरेन्सिक अहवालाची प्रतीक्षा आहे. त्यानुसार पोलीस संकेतवर गुन्हा दाखल करायचा की नाही, याचा निर्णय घेतील. संकेत कार चालवत नसले, तरीही त्यांनी दारुच्या नशेत असलेल्या मित्राला ड्रायव्हिंग सीटवर बसण्याची परवानगी दिली होती, या कारणावरुन कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.

काय घडलं नेमकं?
संकेत बावनकुळे आणि त्यांचे मित्र रविवारी मध्यरात्रीनंतर उच्चभ्रू धरमपेठेतील एका बार आणि रेस्टॉरंटमधून बाहेर पडले. तिथे त्यांनी ३ हजार २८० रुपयांचे भरले होते. संकेत यांनी आपला मित्र अर्जुन हावरेला त्यांची १.२ कोटींची नवीन ऑडीक्यू८ गाडी चालवण्यास दिली. बेदरकारपणे कार चालवत अर्जुनने प्रेस क्लबचे कर्मचारी जितेंद्र सोनकांबळे यांच्या कारला धडक दिली. त्यावेळी अर्जुनच्या बाजूला संकेत, तर मागील सीटवर रोनित चिंतमवार बसले होते.

…तर संकेत सहआरोपी होणार
संकेत यांनी गाडीच्या चाव्या मद्यधुंद अवस्थेतील अर्जुन हावरेला दिल्याबद्दल त्यांनाही या प्रकरणात सहआरोपी करायला हवे, असे पोलिसांच्या एका विभागाचे मत आहे. संकेत ऑडी चालवत नव्हते, किंवा त्यांनी मद्यपान केल्याचे कोणतेही पुरावे नाहीत, अर्जुन प्रौढ असून त्याच्याकडे वैध वाहन चालक परवानाही आहे. त्यामुळे संकेत यांना त्यास कारच्या चाव्या देण्याचा अधिकार आहे, असे सांगणाऱ्या पोलिसांनी आता आपली भूमिका बदलल्याचे दिसते.

चंद्रशेखर बावनकुळेंसारख्या प्रभावशाली राजकीय नेत्याच्या मुलाला वाचवण्याच्या आरोपावरुन ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पोलिसांची भेट घेतली. त्यानंतर, सामाजिक-राजकीय दबाव वाढल्याने पोलिसांनी नवी भूमिका घेतल्याचे दिसते. “अर्जुन हावरेच्या रक्त चाचणी अहवालात अल्कोहोलचे प्रमाण जास्त असल्यास संकेत बावनकुळेंवर गुन्हा दाखल करण्यासाठी भारतीय न्याय संहितेनुसार कारवाई करण्यासाठी कायदे विषयातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा लागेल” असे सूत्रांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *