महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ सप्टेंबर ।। दरमहिना पगारावर काम करणाऱ्या व्यक्तीसाठी निवृत्तीनंतर पेन्शन हाच एकमेव आधार असतो, ज्याच्या मदतीने उतारवयात कोणावरही अवलंबून न राहता टेन्शन-फ्री जगू शकतो. म्हणूनच लोक या पेन्शनला म्हातारपणाची काठीही म्हणतात पण बहुतेकदा पेन्शनधारकांना वेळेवर पेन्शन न मिळाल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, मात्र आता ही अडचण आता दूर होणार असल्याने कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळण्यास विलंब होणार नाही.
सरकारने अधिकाऱ्यांना फटकारले
पेन्शनचे दावे निकाली काढण्यासाठी होत असलेल्या दिरंगाईची केंद्र सरकारने गांभीर्याने दखल घेतली आणि कर्मचाऱ्यांची अडचण दूर करण्यासाठी अर्थ मंत्रालयाने केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाला निवेदन सादर केले आणि म्हटले आहे की, CCS (पेन्शन) नियम, २०२१ मध्ये निर्धारित वेळेचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. त्याचबरोबर, येत्या काही दिवसांत सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही वेळेवर सेटलमेंट प्रक्रियेत सहभागी होण्याच्या सूचनाही सरकारने दिल्या आहेत.
पेन्शनचे दावे निकाली काढण्याची प्रक्रिया
केंद्रीय कर्मचारी सेवानिवृत्तीच्या तारखेच्या एक वर्ष आधी सेवा नोंदी आणि इतर पूर्वतयारीची पडताळणी सुरू करू शकतात. त्याचबरोबर सेवानिवृत्तीच्या सहा महिनेआधी आवश्यक कागदपत्रे कार्यालय प्रमुखाला पाठवणे बंधनकारक आहे, तर पेन्शन प्रकरण चार महिने आधी पेन्शन लेखा कार्यालयात पाठवावे लागते.
सरकारने लाँच केला 6A फॉर्म
दरम्यान, पेन्शनधारकांसाठी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी अलीकडेच केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी ९ वेगवेगळ्या फॉर्मच्या जागी एक फॉर्म 6A लाँच केला. याशिवाय, केंद्रित मंत्र्यांनी ई-एचआरएमएसचे भविष्याशी एकीकरण करण्याची घोषणा केली, जे पेन्शनशी संबंधित प्रक्रिया सुलभ करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. उल्लेखनीय आहे की सरकारने सुरू केलेला फॉर्म 6A जानेवारी २०२५ नंतर निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना ई-HRMS मध्ये उपलब्ध असेल. या फॉर्ममुळे कर्मचाऱ्यांना जास्त कागदोपत्री काम करावे लागणार नाही आणि त्यांचा वेळही वाचेल असा दावा सरकारने केला आहे. ई-एचआरएमएस इलेक्ट्रॉनिक मानव संसाधन व्यवस्थापन प्रणाली म्हणून ओळखली जाते, ज्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवा रेकॉर्ड आणि इतर तपशिलांची नोंद असते.