Dasara Melava 2024 : दसरा मेळाव्याला शिवतीर्थावर ठाकरेंचाच आवाज घुमणार?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ सप्टेंबर ।। गेल्या अनेक दिवसांपासून यंदाच्या दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क कोणाला मिळणार? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. तर दुसरीकडे या वर्षीही शिवाजी पार्कवर (Shivaji Park) दसऱ्याच्या (Dasara Melava) मुहूर्तावर ठाकरेंचाच आवाज घुमणार असल्याचं बोललं जातंय. कारण शिवसेना ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावं, यासाठी मागील आठ महिन्यात मुंबई महापालिकेला अर्जासोबत तीन स्मरणपत्र देण्यात आल्याची माहिती आहे, तर शिवसेना शिंदे गटाकडून या संदर्भात अद्याप कोणताही अर्ज केला नसल्याची माहिती सुत्रांकडून कळत आहे. त्यामुळे यंदाही दसरा मेळाव्याला शिवतीर्थावर ठाकरेंचाच आवाज घुमणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

गणेशोत्सवानंतर महापालिका घेणार निर्णय
दरवर्षी शिवाजी पार्क मैदानावर होणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात कुठल्याही प्रकारे अडचण येऊ नये यासाठी आठ महिन्याआधीच शिवसेना ठाकरे गटाच्या विभाग प्रमुखांकडून अर्ज आणि स्मरणपत्र देण्यात आले आहे. तर सध्या गणेशोत्सव सुरू असल्याने दसरा मेळाव्याच्या परवानगी संदर्भात मुंबई महापालिका याबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती आहे. 18 सप्टेंबरनंतर मुंबई महापालिका परवानगी संदर्भात योग्य तो निर्णय घेऊन संबंधित अर्जदाराला याबाबत कळवणार आहे. तर शिवसेना शिंदे गटाकडून यंदाच्या दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मेळावा यासाठी अद्याप अर्ज केली नसल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाला दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी सुद्धा दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क मैदान मिळावं याची प्रतीक्षा आहे

शिंदे गटाला मेळावा दुसरीकडे घेण्याचे संकेत
शिवतीर्थवर दसरा मेळावा घेण्यासाठी वर्ष 2023 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला परवानगी मिळाली होती. मुंबई महापालिकेने ठाकरे गटाला ही परवागनी दिली होती. त्यानुसार ठाकरे गटाचा दसरा मेळावा 24 ऑक्टोबरला शिवतीर्थवर पार पडला होता. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्क ऐवजी दुसरीकडे घेण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार शिंदे गटाने शिवतीर्थवर दसरा मेळावा घेण्यासाठी महापालिकेकडे केलेला अर्ज मागे घेतला होता. अखेर महापालिकेने शिवसेना ठाकरे गटाला परवानगी दिली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *