महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ सप्टेंबर ।। मध्य भारतातील कमी दाबाच्या क्षेत्राने बाष्प खेचून नेल्याने राज्यातील अनेक भागात सध्या पावसाने उघडीप दिली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कोणत्याही भागात जोरदार पाऊस झाला नाही. मात्र आजपासून पुन्हा राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होत असून मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उर्वरित ठिकाणी ढगाळ वातावरणासह पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पुढील २४ तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज.
शहर आणि उपनगरात अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे, आकाश अंशतः ढगाळ राहील.
कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३२°C आणि २६°C च्या आसपास असेल.— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) September 13, 2024
विदर्भ-मराठवाड्यात कोसळणार पाऊस
मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये येत्या दोन दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी मशागतीचे कामे लवकर आटोपून घ्यावी, असा सल्लाही देण्यात आला आहे.
नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात देखील आज शनिवारी आणि उद्या रविवारी जोरदार पावसाची शक्यता आहे. मुंबईसह उपनगरात दिवसभर ढगाळ वातावरण राहणार असून अधून मधून पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यात रिमझिम पावसाची शक्यता आहे.
आयएमडीने जारी केलेल्या अंदाजानुसार, मान्सूनने आता परतीचा प्रवास सुरू केला आहे. त्यामुळे वातावरणात अनेक मोठे बदल होत आहेत. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा पंजाबच्या अमृतसरपासून दिल्ली तीव्र कमी दाबाचे केंद्र ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत कायम आहे. दक्षिण गुजरात ते कर्नाटकपर्यंत किनारपट्टीला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.
देशातील १८ राज्यांना पावसाचा इशारा
सध्या हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पावसाने अक्षरश: कहर केला आहे. दोन्ही राज्यांना पावसाने चांगलंच झोडपून काढलंय अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्याने अनेक राष्ट्रीय महामार्गांसह ४०० हून अधिक रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. बद्रीनाथ महामार्गही शुक्रवारी दिवसभर बंद राहिलाय. तर केदारनाथ पदपथ दुसऱ्या दिवशीही खुला होऊ शकला नाही.
पावसामुळे नद्या-नाले तुडूंब भरून वाहत असून रस्ते जलमय झाले आहेत. त्यामुळेजनजीवन विस्कळीत झाले आहे. पुढील तीन दिवस अशीच परिस्थिती कायम राहणार असून हवामान खात्याने मध्य प्रदेश आणि छत्तीसगडसह 18 राज्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
ओडिशा, पश्चिम बंगाल आणि दक्षिण छत्तीसगडमध्ये अतिमुसळधार पावसाबाबत अलर्ट जारी केला आहे. याशिवाय उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, झारखंड, सिक्कीम, मध्य महाराष्ट्र, गुजरात आणि सर्व ईशान्येकडील राज्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्येही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.