Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा पुन्हा प्रयत्न? फ्लोरिडातील गोल्फ क्लबबाहेर गोळीबार; हल्लेखोर अटकेत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १६ सप्टेंबर ।। Donald Trump Assassination Attempt : रविवारी फ्लोरिडा येथील गोल्फ क्लब येथे गोळीबाराची घटना घडली आहे. यावेळी ट्रम्प या ठिकाणी असल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया देत आपण सुरक्षित असल्याचे म्हटलं आहे. याप्रकरणी हल्लेखोराला अटक करण्यात आली असून त्याने हा हल्ला का केला, याचा तपास करत असल्याचे एफबीआयने सांगितलं आहे. या हल्लानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा पुन्हा एकदा प्रयत्न करण्यात आल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, रविवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास फ्लोरिडा येथील गोल्फ क्लबबाहेर गोळीबाराची घटना घडली आहे. यावेळी डोनाल्ड ट्रम्पही याच ठिकाणी गोल्फ खेळत होते, अशी माहिती आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यापासून ३०० ते ५०० यार्डवर हा हल्ला झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोळीबार सुरु होताच सिक्रेट सर्विसच्या अधिकाऱ्यांनीही लगेच हल्लाखोराच्या दिशेने गोळीबार सुरू केला. मात्र, हल्लेखोराला पळून जाण्यात यश आलं. पण पुढे काही तासांतच हल्लेखोराला अटक करण्यात आली. रायन वेस्ली रुथ (५८) असं या हल्लेखोराचं नाव आहे.

या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना ईमेल केला आहे. माझ्या आसपास गोळीबार झाला परंतू मी सुरक्षित आहे. कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. मला कुणीही रोखू शकत नाही. मी कधीही सरेंडर करणार नाही, असं त्यांनी समर्थकांना म्हटलं आहे. एफबीआयने यासंदर्भात निवेदन जारी केलं आहे. या घटनेनंतर आम्ही डोनाल्ड ट्रम्प यांना सुरक्षित बाहेर काढलं असून हा हल्ला डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न होता का? तसेच या हल्ल्यामागचे नेमका हेतू काय? याचा तपास करत असल्याचे एफबीआयने त्यांच्या निवेदनात म्हटलं आहे.

या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि डेमोक्रेटिक पक्षाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ट्रम्प यांच्या क्लबबाहेर झालेल्या हल्ल्याचा तपास सुरु केला आहे. ते सुरक्षित आहेत, हे ऐकून आनंद झाला, अशी प्रतिक्रिया जोड बायडेन यांनी दिली आहे. तर फ्लोरिडात माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प क्लबबाहेर गोळीबाराची घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. ट्रम्प सुरक्षित असल्याचं ऐकून मला बरं वाटलं. अमेरिकेत हिंसेसाठी कुठलीही जागा नाही असं कमला हॅरिस यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *