PN Gadgil ज्वेलर्सचे दणक्यात पदार्पण! पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना केलं मालामाल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ सप्टेंबर ।। शेअर मार्केटमध्ये आयपीओंचे दणक्यात लिस्टिंग सुरूच आहे. सोमवारी बजाज हाउसिंग फायनान्सचे दणक्यात लिस्टिंग झाल्यांनतर आता दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी पीएन गाडगीळ कंपनीच्या आयपीओनेही दिमाखात शेअर बाजारात पदार्पण केले आहे. पीएन गाडगीळ ज्वेलर्स लिमिटेडचा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी ब्लॉकबस्टर ठरला आणि पहिल्याच दिवशी शेअर्स बीएसईवर ८३४ रुपयांना लिस्ट झाले तर, आयपीओची किंमत ४८० रुपये होती. अशाप्रकारे, गुंतवणूकदारांना लिस्टिंगवर ७४ टक्क्यांचा फायदा झाला मात्र, लिस्टिंगनंतर पीएन गाडगीळच्या शेअर्समध्ये प्रॉफिट बुकिंगचा दबाव दिसत आहे.

दरम्यान, आयपीओला एकूणच जास्त सबस्क्रिप्शन मिळाले तर ग्रे मार्केटमध्येही प्रीमियम ६० टक्क्यांहून अधिक होता. गेल्या आठवड्यात पीएन गाडगीळचा आयपीओ ओपन झाला तर तीन दिवसांत एकूण ५९.४१ पट सबस्क्राइब झाला. यादरम्यान, QIB साठी राखीव भाग एकूण १३६.८५ पट भरला तर NII साठी एकूण राखीव भाग ५६.०८ पट आणि रिटेल गुंतवणूकदारांसाठी राखीव हिस्सा १६.५८ पट भरला गेला. या आयपीओला ग्रे मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि आयपीओ उघडला त्या दिवशी ग्रे मार्केट प्रीमियम दर २४० रुपये होता.

कंपनीचा व्यवसाय काय
ब्रोकरेज हाऊस कॅनरा बँक सिक्युरिटीजच्या माहितीनुसार कंपनीचे महाराष्ट्रात ३८ स्टोअर्ससह मजबूत व्यवसाय आहे तर पुढील दोन वर्षात महाराष्ट्रात १२ नवीन स्टोअर्स उघडण्याची कंपनीची योजना असून त्यानंतर शेजारच्या राज्यांमध्ये विस्तार केला जाईल. सहा वर्षांत १२० दुकानांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य आहे.

वाढीच्या ट्रेंडचा फायदा घेण्यास सज्ज
ब्रोकरेज हाऊस SBI सिक्युरिटीजने म्हटले की ही कंपनी महाराष्ट्रातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या संघटित ज्वेलर्सपैकी एक आणि ‘पीएन गाडगीळ’ ब्रँडच्या वारशाखाली कार्यरत आहे. कंपनीचा महसूल, EBITDA आणि निव्वळ नफ्यामध्ये CAGR वाढ ५४.६%, ५५.५% आणि ४९% असून कंपनीला आयपीओ उत्पन्नातून कर्जाची परतफेड केल्यानंतर वित्त खर्चातून ३१ कोटींची बचत होण्यास अपेक्षित असून आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये १२ नवीन स्टोअर उघडण्यासाठी ३९३ कोटी वापरण्याची योजना आहे. तसेच कंपनी ज्वेलरी मार्केटच्या वाढीच्या ट्रेंडचा फायदा घेण्यासाठी देखील सज्ज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *