![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १९ सप्टेंबर ।। राज्यभरात गणपती बाप्पाचा विसर्जन सोहळा मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात पार पडला. गणरायाचे आगमन झाल्यापासून राज्यामध्ये पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र आता गणरायाला निरोप दिल्यानंतर उसंती घेतलेला पाऊस पुन्हा एकदा दमदार हजेरी लावणार आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दमदार पाऊस बरसेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
गणपती बाप्पाच्या विसर्जनानंतर राज्यामध्ये पुन्हा एकदा पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. झारखंड आणि उत्तर छत्तीसगडमध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेशकडे सरकला आहे. त्यामुळं मध्यप्रदेश आणि उत्तरमधील तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच येत्या दोन दिवसांमध्ये राज्यातही जोरदार पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आज गुरुवार, (ता. १९ सप्टेंबर) संपूर्ण राज्यामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे, तसेच काही भागांमध्ये उघडीप राहण्याचा अंदाज आहे. मुख्यतः आज मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा या भागांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकटासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. उर्वरित राज्यात मुख्यतः उघडिपीसह हलक्या सरींची अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
दरम्यान, शुक्रवारपासून काही जिल्ह्यात पाऊस पुन्हा जोर धरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सध्या काही भागात कापणीची काम सुरू झाली आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांची मात्र चिंता वाढण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. एकूणच सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच 21 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरदरम्यान राज्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
