महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २० सप्टेंबर ।। मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे तापमानात मोठी वाढ होत आहे. उन्हाचा चटका वाढत असल्याने घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. त्यामुळे पाऊस नेमका कधी पडणार, असा प्रश्न अनेकांना पडलाय. अशातच नागरिकांना उकाड्यातून दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस वातावरणात मोठा बदल झाला असून राज्यातील काही भागात विजांच्या कडकडाटसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
यापार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील उर्वरित कामे लवकर आटोपून घ्यावी, असा सल्लाही देण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कमी दाबाचे क्षेत्र निवळल्यानंतर वायव्य मध्य प्रदेश आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.
परिणामी आज कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील बहुतांश भागात पावसाला पोषक हवामान झाल्याने आकाश ढगाळ झाले आहे. आज (ता. २०) पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये तुफान पावसाची शक्यता आहे.
19 Sept,4 Week's Rainfall forecast WK1:Near normal in many parts of NW & Central India.Below normal likly ovr E & NE India,HP,Uttarakhand,UP, Konkan-Goa,KA,Kerala
Wk2:AN likly ovr most India.Near normal in NE India &TN
Wk3:AN likly ovr Central,NW,E & NE India.Near normal in South pic.twitter.com/aSYWeB5et0— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 19, 2024
तर जळगाव, नाशिक, नगर, पुणे जिल्ह्यालाही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सातारा, सांगली, बीड, परभणी, हिंगोली, धाराशिव, नांदेड, लातूर जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भासह उर्वरित महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहणार असून पावसाची उघडीप राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
दरम्यान, पावसाने दडी मारल्यानंतर राज्यातील कमाल आणि किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे. गुरुवारी राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद जेऊर येथे झाली. गेल्या २४ तासांत याठिकाणी ३५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर अनेक ठिकाणी तापमान ३२ अंशांच्या पार गेले आहेत. मुंबई आणि पुण्यातील तापमानामुळे नागरिकांच्या अंगातून घामाच्या धारा निघत आहेत.