Ajit Pawar: जिंकलेली एकही जागा राष्ट्रवादी सोडणार नाही; अजित पवारांचा आमदारांना दिलासा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २० सप्टेंबर ।। राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षचिन्हावर निवडून आलेल्या एकाही आमदाराला त्याच्या जागेवर पाणी सोडावे लागणार नाही. गेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या ५४ जागा आणि पक्षात येऊ इच्छिणाऱ्यांसाठी अतिरिक्त जागा कुठल्याही परिस्थितीत जागावाटपात मिळवू, असे दिलासादायक आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी आमदारांना दिले. सर्व आमदारांनी निवडणुकीच्या कामाला लागा आणि तिकीटाबद्दल निश्चिंत राहा, असेही पवार यांनी आमदारांना सांगितल्याचे कळते.

महायुतीतील घटकपक्षांमध्ये जागावाटपावरुन जोरदार रस्सीखेच सुरू असून, भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्ष १०० पेक्षा जास्त जागांवर निवडणूक लढविणार असा दावा करीत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या वाट्याला किती जागा शिल्लक राहणार याविषयी पक्षाच्या आमदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. तसेच, लोकसभेत पक्षाला अपयश पदरात पडल्यानंतर राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार असलेल्या मतदारसंघातही महायुतीतील घटकपक्ष दावा ठोकत असल्याने आमदारांची धाकधूक वाढली होती. या पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थान देवगिरी येथे आमदारांची बैठक पार पडली.

या बैठकीत आमदारांनी अजित पवार यांच्यापुढे आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्याला किती जागा मिळणार, विद्यमान जागा कायम राहणार का तसेच जागांची अदलाबदली होणार का, अशाप्रकारच्या शंकांची सरबत्ती केली. महायुतीतील दोन्ही पक्ष मागत असलेल्या जागा पाहता आपल्याला किती जागा मिळणार असेही प्रश्न आमदारांनी पवार यांच्यापुढे मांडले. यावर उत्तर देताना पवार यांनी सर्व आमदारांना सांगितले की, गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने घड्याळ चिन्हावर ५४ जागांवर विजय मिळवला होता. आता जरी आपल्यासोबत ४१ आमदार असले तरीही विद्यमान आमदारांच्या सूत्रानुसार त्या जागा पक्षाकडेच राहतील. तसेच तीन ते चार इतर पक्षातील आमदार राष्ट्रवादीत दाखल होणार असून, त्याही जागा आपल्याकडेच राहतील. एकाही विद्यमान आमदाराची जागा घटकपक्षाकडे जाणार नाही, असे आश्वासनही यावेळी पवार यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *