महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २० सप्टेंबर ।। गुजरातमधील राजकोट येथे राहणारा जयदीप गोहिल हा ‘हायड्रोमॅन’ या नावानेही ओळखला जातो. व्यवसायाने अभियंता असलेला जयदीप त्याच्या पाण्यात नृत्य करण्याच्या अनोख्या कलेसाठी प्रसिद्ध आहे. ‘हायड्रोमॅन’ ही त्याची ओळख विशेष आहे, कारण तो पाण्याशी समन्वय राखून आपली कामगिरी सुंदरपणे सादर करतो, त्यामुळे लोकांमध्ये त्याची लोकप्रियता वाढली आहे. आता त्याचा नवीन व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तो जगातील सर्वात खोल स्विमिंग पूल म्हणजेच ‘डीप डायव्ह दुबई’मध्ये मायकल जॅक्सनच्या गाण्यावर परफॉर्म करताना दिसत आहे.
पाण्यात नृत्य करणे खूप आव्हानात्मक असते, कारण शरीराचा समतोल राखणे आणि विशिष्ट लयीत हालचाली करणे सोपे नाही. पण जयदीपने ती आपली कला म्हणून अंगीकारली आहे आणि आपले तंत्र सुधारले आहे, ज्यामुळे तो आपली कामगिरी आणखीनच प्रभावी बनवू शकतो. व्हिडिओमध्ये तो दिवंगत पॉप स्टार मायकल जॅक्सनच्या गाण्यावर सुंदर नृत्य करताना दिसत आहे. जयदीप पाण्याखाली मासा फिरत असल्याप्रमाणे नाचत आहे. व्हिडिओचा सर्वात मजेशीर भाग म्हणजे त्याचा पाण्याखाली मूनवॉक.
इन्स्टा हँडलवरून व्हिडिओ अपलोड केल्यानंतर @hydroman_333 खूप खळबळ माजवत आहे. वृत्त लिहिपर्यंत 1.37 लाखांहून अधिक लोकांनी या पोस्टला लाईक केले आहे. ही संख्या झपाट्याने वाढत आहे.
दुबई शहरापासून 15 मिनिटांच्या अंतरावर नाद अल शेबा येथे स्थित डीप डायव्ह दुबई हा जगातील सर्वात खोल जलतरण तलाव आहे. त्याची खोली 60.02 मीटर आहे. हा पूल 14 दशलक्ष लिटर पाण्याने भरलेला आहे, जे सहा ऑलिम्पिक आकाराच्या जलतरण तलावांच्या समतुल्य आहे. जलमग्न शहराच्या थीमवर त्याची रचना करण्यात आली आहे. पाणी 30 अंश तापमानात ठेवले जाते, जे स्विमसूट किंवा पातळ वेटसूट घालण्यासाठी आरामदायक आहे.