शरद पवारांच्या धक्कातंत्राने महायुतीला घाम फुटणार ; शिवसेना मंत्र्याचा पुतण्या गळाला ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २० सप्टेंबर ।। शरद पवारांचे बेरजेचे राजकारण हे सर्वश्रूत आहे. कोणतीही निवडणूक असो शरद पवारांच्या धक्कातंत्रामुळे भल्याभल्यांना घाम फुटतो. अशाच रीतीने यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरही शरद पवार धक्कातंत्राचा उपयोग करताना दिसत आहेत. शरद पवारांनी आता शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्याचाच पुतण्या आपल्या गळाला लावला आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत लवकरच तुतारी फुंकणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

अनिल सावंत यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे शरद पवार पक्षाच्या अध्यक्षांची बारामतीमध्ये जाऊन भेट घेतली होती. तर सूरज देशमुख आणि नानासाहेब देशमुख यांच्या पक्षप्रवेशावेळी राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर हजेरी लावली होती. तसेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत एकाच गाडीतून प्रवास देखील केला होता. अनिल सावंतांच्या राष्ट्रवादी नेत्यांशी या वाढत्या सलगीमुळे ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर अनिल सावंत राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची महत्वाची बातमी सूत्रांच्या माध्यमातून समोर येत आहे. घटस्थापनेनंतर अनिल सावंत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते.

भैरवनाथ शुगरचे उपाध्यक्ष असलेले अनिल सावंत मागच्या १० वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघामध्ये सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रीयपणे काम करत आहेत. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मतदारसंघ धाराशिव जिल्ह्यातील परांडा आहे, त्यामुळे माझ्यासाठी कोणत्याही प्रकारचा अडसर नाही, असे अनिल सावंतांनी स्पष्ट केले आहे. तर सावंत हे पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याचे त्यांनी वारंवार जाहीरपणे सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *