ENG vs AUS 1st ODI : २५ चेंडूंत ११० धावा! Travis Head ला रोखणं झालंय अवघड

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २० सप्टेंबर ।। Travis Heads unbeaten Hundred AUS vs ENG : फॉरमॅट कोणताही असो ट्रॅव्हिस हेड याची फटकेबाजी पाहायला मिळतेच… कसोटी, ट्वेंटी-२० मालिकांनंतर आता हेडने वन डे मालिकेतही खणखणीत फटकेबाजी करून दाखवली आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात हेडचे षटकार-चौकार यांचा चाहत्यांनी आनंद लुटला.. जोफ्रा आर्चरला त्याने लगावलेला षटकार अप्रतिम होता. त्याच्या याच आक्रमक खेळाच्या जोरावर वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाने वन डे सामन्यांतील विजयाची मालिका सलग १३व्या सामन्यात कायम राखली.

प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा संपूर्ण संघ ४९.४ षटकांत ३१५ धावांवर ऑल आऊट झाला. बेन डकेट आणि विल जॅक्स यांनी दमदार खेळ केला. डकेटने ९१ चेंडूंत ११ चौकारांच्या मदतीने ९५ धावांची खेळी केली, तर जॅक्सने ५ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ५६ चेंडूंत ६५ धावा केल्या. कर्णधार हॅरी ब्रूकने ३९ आणि जेकब बेथेलने ३५ धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाच्या एडम झम्पा ( ३-४९), मार्नस लाबुशेन ( ३-३९) आणि ट्रॅव्हिस हेड ( २-३४) यांनी गोलंदाजीत कमाल करून दाखवली.

लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर व कर्णधार मिचेल मार्श १० धावांवर तंबूत परतला. पण, ट्रॅव्हिस हेड उभा राहिला. त्याने दुसऱ्या विकेटसाठी स्टीव्ह स्मिथसह ( ३२) ७६ धावांची भागीदारी केली. त्यानंतर कॅमेरून ग्रीनसह ( ३२) तिसऱ्या विकेटसाठी ७३ धावा जोडल्या. गोलंदाजीत कमाल करणाऱ्या लाबुशेन आणि हेड यांची नंतर जोडी जमली आणि दोघांनी ४४ षटकांत संघाचा विजय पक्का केला. लाबुशेन ६१ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ७७ धावांवर नाबाद राहिला. हेडने १२९ चेंडूंत १५४ धावांची नाबाद खेळी केली. यात त्याने २० चौकार व ५ षटकार खेचून अवघ्या २५ चेंडूंत ११० धावांचा पाऊस पाडला.

ऑस्ट्रेलियाचा हा वन डे क्रिकेटमधील सलग १३ वा विजय ठरला आणि त्यांनी श्रीलंकेच्या ( जून २०२३ ते सप्टेंबर २०२३) विक्रमाशी बरोबरी केली, तर दक्षिण आफ्रिके व पाकिस्तानचा सलग १२ विजयांचा विक्रम मोडला. या विक्रमात ऑस्ट्रेलिया सलग २१ विजयांसह ( जानेवारी २००३ ते मे २००३) अव्वल स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया वि. इंग्लंड यांच्यातल्या वन डे सामन्यातील ट्रॅव्हिस हेडच्या १५४ धावा ही दुसरी सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे. शेन वॉटसनने २०११ मध्ये मेलबर्नवर नाबाद १६१ धावा केल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *